Sunday , September 20 2026
Breaking News

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त १,२६० सीसीटीव्हींच्या नजरकैदेत बेळगाव; १९ चेकपोस्टवर २४ तास तपासणी

Spread the love

 

यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना

बेळगाव : गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी बेळगाव शहर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. यंदा शहरात तब्बल १,१५६ गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना होणार असून, त्यापैकी २१ मूर्ती नव्याने प्रतिष्ठापित केल्या जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी पत्रकार परिषदेत बंदोबस्ताची माहिती देत नागरिक व गणेश मंडळांना शांततेत उत्सव साजरा करण्याचे आवाहन केले.

गणेशमूर्तींच्या आगमन सोहळ्याला ४ सप्टेंबरपासून सुरुवात झाली असून, आतापर्यंत सुमारे ७५ गणेशमूर्तींचे शहरात आगमन झाले आहे. उत्सवासाठी दोन टप्प्यांत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यातील बंदोबस्त गणेश विसर्जनापर्यंत कायम राहणार आहे.

३२ सेक्टरमध्ये शहराचे विभाजन

कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी शहराचे ३२ सेक्टरमध्ये विभाजन करण्यात आले आहे. प्रत्येक सेक्टरसाठी पीएसआय आणि एएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, सहा सीपीआय आणि दोन एसीपी यांच्या देखरेखीखाली बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली आहे. शहरात १२० फिक्स पॉइंट निश्चित करण्यात आले आहेत.

राज्यातील इतर जिल्ह्यांतून तसेच विशेष पथकांमधून अतिरिक्त पोलिस मनुष्यबळ मागविण्यात आले आहे. सीएआर, केएसआरपी आणि आरएएफच्या जवानांचीही शहरात नियुक्ती करण्यात आली आहे. संवेदनशील भागांत पथसंचलन करून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.

१,२६० सीसीटीव्हींची नजर

शहरातील अतिसंवेदनशील भागांमध्ये तब्बल १,२६० सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांकडून २४ तास परिस्थितीवर नजर ठेवण्यात येणार आहे. प्रत्येक गणेश मंडपात तीन शिफ्टमध्ये किमान दोन पोलिस कर्मचारी २४ तास तैनात राहणार आहेत. धार्मिक स्थळे आणि महत्त्वाच्या ठिकाणीही स्वतंत्र बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

शहराच्या प्रवेशद्वारांवर १९ चेकपोस्ट

गणेशोत्सव काळात शहरात येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गांवर १९ चेकपोस्ट सुरू करण्यात आले आहेत. येथे संशयित व्यक्ती आणि वाहनांची २४ तास तपासणी केली जाणार आहे.

समाजकंटकांवर पोलिसांची करडी नजर राहणार असून, उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस आयुक्त प्रकाश निकम यांनी दिला.

About Belgaum Varta

Check Also

प्रसूतीनंतर अतिरक्तस्रावाने २६ वर्षीय महिलेचा मृत्यू

Spread the love    चार वर्षांच्या मुलासह नवजात कन्येच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले निलजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *