Sunday , September 20 2026
Breaking News

बाप्पाच्या आगमनाने घराघरांत आनंदाचा जल्लोष!

Spread the love

 

 

हरतालिका पूजेनंतर गणरायाचे स्वागत; गृहिणींची धावपळ, भक्ती आणि उत्साहाला उधाण

बेळगाव : विघ्नहर्ता श्री गणरायाच्या आगमनाने बेळगाव शहरासह परिसरातील घराघरांत आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले. फटाक्यांची आतषबाजी, ढोल-ताशांचा गजर आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. आबालवृद्धांसह बालचमूही गणरायाच्या स्वागतासाठी उत्साहाने सहभागी झाल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळाले.

यंदा हरतालिका आणि गणेश चतुर्थी एकाच दिवशी आल्याने गृहिणींची सकाळपासूनच चांगलीच लगबग सुरू होती. पहाटेपासून हरतालिकेची पूजा, नैवेद्याची तयारी आणि स्वयंपाक उरकून त्यानंतर गणरायाच्या आगमनाची तयारी करण्याची धावपळ गृहिणींना करावी लागली. मात्र या सगळ्या व्यापातही त्यांच्या उत्साहात कुठेही कमी जाणवली नाही. उलट, बाप्पाच्या स्वागताच्या आनंदाने घराघरांत उत्साहाला उधाण आले होते.

साडेअकरानंतर गणरायाच्या आगमनाला सुरुवात होताच गल्लीबोळांत भक्तांची लगबग वाढली. ढोल-ताशे, पारंपरिक वाद्ये आणि फटाक्यांच्या आतषबाजीत गणरायाला वाजतगाजत घरी आणण्यात आले. घराच्या प्रवेशद्वारावर तसेच विहिरीजवळ विधिवत पूजा करून गणरायाला नैवेद्य अर्पण करण्यात आला. अनेक घरांमध्ये आकर्षक सजावट, विविध देखावे आणि कल्पक आरास करण्यात आली होती.

गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यापूर्वी घरातील पुरुष मंडळी आणि युवक सजावटीची अंतिम तयारी करताना दिसत होते. तर गृहिणी पहाटेपासूनच पूजेचा नैवेद्य, विविध पदार्थ आणि स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होत्या. बाप्पाच्या स्वागतासाठी घरातील प्रत्येक सदस्य आपापल्या परीने योगदान देत असल्याने घराघरांत उत्साहाचे आणि आपुलकीचे वातावरण निर्माण झाले होते.

घरगुती गणेशोत्सवाबरोबरच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्येही कार्यकर्त्यांची लगबग सुरू होती. अनेक मंडळांचे आगमन सोहळे यापूर्वीच पार पडल्याने कार्यकर्त्यांना आता मंडपातील सजावट, देखावे आणि धार्मिक कार्यक्रमांच्या नियोजनासाठी काहीसा निवांतपणा मिळाला आहे.

विशेष म्हणजे, यंदा तिथीवृद्धीमुळे बाप्पा तब्बल बारा दिवस भक्तांच्या सान्निध्यात राहणार असल्याने गणेशभक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. पुढील बारा दिवस घराघरांत पूजा, आरती, नैवेद्य आणि विविध धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे.

एकंदरीत, बाप्पाच्या आगमनाने बेळगाव शहरातील वातावरण भक्ती, उत्साह आणि आनंदाने भारावून गेले असून, गणरायाच्या आगमनाने घराघरांत जणू आनंदाचा उत्सवच फुलला आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *