Sunday , September 20 2026
Breaking News

दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिका सज्ज

Spread the love

 

घरगुती मूर्तींसाठी सहा फिरते विसर्जन कुंड; शहरातील विसर्जन तलावांची स्वच्छता व रंगरंगोटी पूर्ण

बेळगाव : लाडक्या गणरायाचे आज घरोघरी उत्साहात आगमन झाले असून, यंदाचा गणेशोत्सव बारा दिवसांचा असल्याने भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी बेळगाव महानगरपालिकेने आवश्यक ती तयारी पूर्ण केली असून, घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी शहरात सहा फिरते विसर्जन कुंड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

बेळगावमध्ये दीड दिवस, पाच दिवस तसेच सात दिवसांच्या घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्याची परंपरा आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना विसर्जनासाठी तलावापर्यंत जाण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी फिरत्या विसर्जन कुंडांची व्यवस्था करण्यात आली आहे. हे कुंड विविध भागांत फिरून नागरिकांना त्यांच्या परिसरातच विसर्जनाची सुविधा उपलब्ध करून देतील.

दरम्यान, बेळगावची गणेश विसर्जन मिरवणूक दिवसेंदिवस अधिक भव्य होत असून, यंदाही तब्बल ३५ तासांहून अधिक काळ विसर्जनाची प्रक्रिया सुरू राहण्याची शक्यता आहे. शहरात ३७० हून अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे असून, त्यांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन विविध तलाव व कुंडांमध्ये केले जाते.

जुना कपिलेश्वर तलाव, नवा कपिलेश्वर तलाव, रामेश्वर कुंड, आंघोळ तलाव, लाल तलाव, कलमेश्वर तलाव, जुने बेळगाव, ब्रह्मदेव मंदिर-मजगाव, नाझर कॅम्प, वडगाव किल्ला तलाव तसेच कणबर्गी तलाव आदी ठिकाणी सार्वजनिक गणेशमूर्तींच्या विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

विसर्जनाची प्रक्रिया सुरळीत पार पडावी, यासाठी महानगरपालिकेकडून या तलावांची स्वच्छता करण्यात आली असून, आवश्यक ठिकाणी रंगरंगोटीही करण्यात आली आहे. विसर्जनाच्या काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, तसेच तलाव परिसरात स्वच्छता आणि सुरक्षितता राखली जावी, यासाठी महापालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

गणरायाचे आगमन होताच आता दीड दिवस, पाच दिवस आणि सातव्या दिवशी होणाऱ्या घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची लगबग सुरू होणार आहे. यासाठी फिरते विसर्जन कुंड आणि विविध विसर्जन स्थळांवरील सुविधा उपलब्ध करून देत महानगरपालिकेने गणेशभक्तांना पर्यावरणपूरक व सोयीस्कर विसर्जनाची सुविधा देण्याची तयारी केली आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *