Sunday , September 20 2026
Breaking News

एसएसएलसी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ

Spread the love

 

नियमित, खासगी आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना वाढीव शुल्काचा भुर्दंड; नोंदणी प्रक्रियेत सुधारित दर लागू

बेळगाव : कर्नाटक शाळा परीक्षा मंडळाने २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील एसएसएलसी (दहावी) परीक्षेच्या शुल्कात पाच टक्के वाढ केली आहे. सरकारच्या धोरणानुसार दरवर्षी परीक्षा शुल्कात पाच टक्के वाढ केली जाते. त्यानुसार नियमित विद्यार्थ्यांसह खासगी उमेदवार आणि फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना यंदा वाढीव शुल्क भरावे लागणार आहे.

कर्नाटक शाळा परीक्षा मंडळाने १० सप्टेंबर रोजी यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. दहावीच्या परीक्षेच्या नोंदणी प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर हे सुधारित शुल्क लागू करण्यात आले आहे. प्रथमच दहावीची परीक्षा देणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसह खासगी उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क ७१० रुपयांवरून ७४६ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे मागील वर्षाच्या तुलनेत विद्यार्थ्यांना सुमारे ३६ रुपये अधिक भरावे लागणार आहेत.

खासगी उमेदवार म्हणून नव्याने दहावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नोंदणी व अर्ज शुल्कही २४८ रुपयांवरून २६० रुपये करण्यात आले आहे. यापूर्वी खासगी उमेदवार म्हणून नोंदणी करून परीक्षा शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदणी नूतनीकरण शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, फेरपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या शुल्कवाढीचा फटका बसणार आहे. एका विषयासाठीचे शुल्क ४४८ रुपयांवरून ४७० रुपये, तर दोन विषयांसाठीचे शुल्क ५६० रुपयांवरून ५८७ रुपये करण्यात आले आहे. त्यामुळे यंदा एसएसएलसी परीक्षेसाठी अर्ज करताना विद्यार्थ्यांना सुधारित शुल्कानुसार रक्कम भरावी लागणार आहे.

विद्यार्थी आणि पालकांनी दहावीच्या परीक्षेची नोंदणी करताना सुधारित शुल्काची नोंद घेऊन त्यानुसार शुल्क भरावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *