







निपाणी (वार्ता) : उत्साहाचे प्रतीक आणि भक्ती भावाचा समजला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक वर्षांची परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते; पण गेल्या काही वर्षांपासून त्याऐवजी आकर्षक विद्युतरोषणाई, गणेशमूर्ती आणि महाप्रसादावर भर दिला जात असल्याचे चित्र निपाणीसह ग्रामीण भागात दिसत आहे.
निपाणी भागातील सार्वजनिक गणेशोत्सवावर शेजारच्या कोल्हापूर आणि बेळगावची छाप आहे. पंधरा वीस वर्षांपूर्वी गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी तर भाविकांच्या रांगा लागायच्या. ग्रामीण भागातून ग्रामस्थ बैलगाड्या करून देखावे पाहण्यासाठी शहरात गर्दी करत होते.
ग्रामीण भागातील नव्या मंडळांनीही देखावे साकारण्याची परंपरा जपली. चित्तवेधक देखावा उभारण्यासाठी विविध मंडळांतील कार्यकत्यांत कमालीची चढाओढ होती.
तांत्रिकसह सजीव देखाव्याची प्रथा रुढ झाली होती.
घरगुती गणरायाचे विसर्जन झाल्यावर सार्वजनिक मंडळाचे देखावे पाहायला नागरिक बाहेर पडत होते. दशकभरात ही परंपरा कमी झाली आहे; पण परंपरा लक्षात घेऊन आजही काही मोजक्या मंडळाचे देखावे पाहण्यासाठी भाविक आवर्जून गर्दी करतात. वाढलेली महागाई आणि उपलब्ध आर्थिक सुविधांच्या पार्श्वभूमीवर मंडळे यंदा या परंपरेकडे वळणार का, याचे औत्सुक्य आहे.
—-
अक्कोळमध्ये परंपरा टिकून
अनेक दशकांपासून अक्कोळमध्ये गणेशोत्सवानिमित्त सर्वच मंडळ विविध प्रकारचे देखावे सादर करतात. यंदाही सर्वच मंडळांनी देखाव्यांची परंपरा कायम ठेवली असून त्यांचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या दोन दिवसांत देखावे नागरिकांसाठी खुले होणार आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta