







बेळगाव-चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात ४१७ पदे रिक्त; २०१३ पासून नियमित भरती नाही
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात शिक्षणासोबत क्रीडा शिक्षणालाही महत्त्वाचे स्थान आहे. मात्र शाळांमध्ये आवश्यक प्रमाणात क्रीडा शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना योग्य क्रीडा मार्गदर्शन मिळण्यात अडथळे निर्माण होत आहेत. बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यात तब्बल ४१७ क्रीडा शिक्षकांची पदे रिक्त असून, २०१३ पासून नियमित भरती न झाल्याने ही समस्या अधिक गंभीर झाली आहे.
एखाद्या विद्यार्थ्याला भविष्यात क्रीडापटू बनायचे असल्यास त्याला शालेय जीवनापासूनच क्रीडेचे योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र क्रीडा शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांना अपेक्षित मार्गदर्शन मिळत नसल्याने त्यांच्या क्रीडा कौशल्यावर परिणाम होत आहे.
बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसाठी मंजूर ३५२ पदांपैकी केवळ १९१ शिक्षक कार्यरत असून १६१ पदे रिक्त आहेत. माध्यमिक शाळांमध्ये मंजूर १४८ पदांपैकी १२६ पदे कार्यरत असून २२ पदे रिक्त आहेत.
क्रीडा शिक्षक उपलब्ध नसलेल्या शाळांमध्ये इतर विषयांच्या शिक्षकांवर क्रीडा शिक्षणाची अतिरिक्त जबाबदारी सोपविली जाते. क्रीडा शिक्षणात प्रत्यक्ष मैदानावर सरावाला विशेष महत्त्व असते. मात्र इतर शैक्षणिक व प्रशासकीय कामांचा ताण असल्याने शिक्षकांना ही जबाबदारी प्रभावीपणे पार पाडताना अडचणी येतात.
याशिवाय तालुका, जिल्हा, विभागीय आणि राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाण्याची जबाबदारीही याच शिक्षकांवर येते. त्यामुळे त्यांच्या नियमित अध्यापनावरही परिणाम होण्याची शक्यता असते.
क्रीडा क्षेत्रात भविष्यातील खेळाडू घडविण्यासाठी शाळेपासूनच योग्य प्रशिक्षण आवश्यक असल्याने बेळगाव आणि चिकोडी शैक्षणिक जिल्ह्यातील रिक्त क्रीडा शिक्षकांची पदे तातडीने भरण्याची मागणी होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta