







सामाजिक कार्यकर्ते गणेश दड्डीकर यांचा पुढाकार
बेळगाव : गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांची दुचाकी अचानक नादुरुस्त झाल्यास त्यांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने १९ सप्टेंबर २०२६ ते २४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बेळगाव शहरातील गणेशोत्सव आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने गणेशभक्त येतात. तसेच महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकाच्या विविध भागांतूनही भाविक बेळगावमध्ये दाखल होतात. विशेषतः रात्रीच्या वेळी दुचाकी अचानक बंद पडल्यास महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच कुटुंबासह आलेल्या भाविकांची गैरसोय होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन हा सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यापूर्वी शिवजयंती उत्सव २०२६ दरम्यान प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारची विनामूल्य दुचाकी दुरुस्ती सेवा उपलब्ध करून देण्यात आली होती. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळाचे उपाध्यक्ष श्री. गणेश दड्डीकर यांनी बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधून यासंदर्भात बैठक आयोजित केली होती.
शिवजयंती मिरवणुकीदरम्यान धर्मवीर संभाजी चौक येथे मेकॅनिक सेवा देण्यासाठी उपस्थित होते. या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून २५० हून अधिक दुचाकींची विनामूल्य दुरुस्ती करण्यात आली होती. या सेवेमुळे असोसिएशनचे सर्वत्र कौतुक झाले. या यशस्वी उपक्रमाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सवातही ही सेवा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते तथा मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाचे सचिव श्री. गणेश दड्डीकर यांच्या पुढाकाराने मोटार मेकॅनिक असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष विजयकुमार निंबरगीकर, उपाध्यक्ष राजू रेडेकर, सेक्रेटरी मारुती गुरव, खजिनदार महेश काकतीकर, संचालक विजय शिंदे, गिरीश नाईक (पिल्लू मिस्त्री) तसेच ४० हून अधिक सदस्यांची बैठक घेण्यात आली. बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.
गणेशोत्सवातील विनामूल्य सेवा उपक्रम
१. रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत सेवा :
गणेशोत्सवाच्या शेवटच्या सहा दिवसांत रात्री ९ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत दुचाकी दुरुस्तीची विनामूल्य सेवा उपलब्ध राहणार आहे. रात्री १ नंतरही एखाद्या भाविकाला मदतीची आवश्यकता असल्यास संबंधित मेकॅनिकशी संपर्क साधता येईल.
२. दुरुस्ती सेवा पूर्णपणे विनामूल्य :
टायर पंक्चर, स्पार्क प्लग, ट्यूब खराब होणे, ऑईल बदलणे, गिअर व ब्रेक वायर बदलणे, स्टार्टरची समस्या तसेच इतर किरकोळ तांत्रिक अडचणींची दुरुस्ती कोणतेही सेवा शुल्क न घेता करण्यात येईल. मात्र वाहनासाठी नवीन सुटे भाग आवश्यक असल्यास ते ‘No Loss – No Profit’ तत्त्वावर उपलब्ध करून देण्यात येतील.
३. आवश्यक कागदपत्रे :
कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दुचाकी मालकाने वाहनाचे RC कार्ड/वाहनाची कागदपत्रे तसेच आधार कार्ड दाखवणे आवश्यक राहील.
४. व्यसनमुक्त गणेशोत्सवाचा संदेश :
मद्य किंवा इतर कोणत्याही व्यसनाच्या प्रभावाखाली वाहन चालवत आलेल्या व्यक्तींना ही सेवा दिली जाणार नाही. गणेशोत्सव हा भक्ती, संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा उत्सव असून तो व्यसनमुक्त असावा, हा संदेश या नियमामागील उद्देश आहे.
५. ४० हून अधिक मेकॅनिकांचा सहभाग :
या उपक्रमासाठी ४० हून अधिक मेकॅनिकांनी स्वेच्छेने पुढाकार घेतला असून त्यांचे ४ ते ५ विभागांमध्ये नियोजन करण्यात आले आहे. संबंधित मेकॅनिक आणि विभागांची माहिती स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.
६. मोठ्या दुरुस्तीसाठी पुढील दिवसाची वेळ :
इंजिनमध्ये मोठा बिघाड झाल्यास किंवा दुरुस्तीसाठी अधिक वेळ लागणार असल्यास ती दुरुस्ती तातडीने न करता वाहन सुरक्षितपणे ठेवण्यात येईल आणि पुढील दिवशी दुरुस्ती करून देण्यात येईल.
७. महिला व ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य :
सेवा देताना महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
गणेशोत्सव काळात बेळगावमध्ये येणाऱ्या प्रत्येक गणेशभक्ताला सुरक्षित आणि सुलभ सेवा मिळावी, कोणाचीही दुचाकी नादुरुस्त झाल्याने गैरसोय होऊ नये आणि अडचणीच्या वेळी नागरिकांना मदतीचा हात मिळावा, या सामाजिक भावनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या सामाजिक उपक्रमासाठी पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते श्री.गणेश दड्डीकर तसेच विनामूल्य सेवा देण्यासाठी सहभागी झालेले बेळगाव स्कूटर आणि मोटरसायकल मेकॅनिक्स वेल्फेअर असोसिएशनचे पदाधिकारी व सर्व सदस्यांचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta