
बेळगाव : शहरातील चव्हाट गल्ली परिसरातील ढोरवाडा येथे गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री घडलेल्या भीषण अग्निकांडाने शहर हादरले आहे. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चौघींचा जिवंत जळून मृत्यू झाल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गजानन धमुने (६५) आणि त्यांचा मुलगा रोशन धमुने (२१) यांचाही आज उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा सहावर पोहोचला आहे.
गणेश चतुर्थीच्या मध्यरात्री चव्हाट गल्लीतील ढोरवाडा परिसरातील घराला अचानक भीषण आग लागली. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केल्याने घरातील कुटुंबीयांना बाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील चार महिलांचा जागीच जळून मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
या दुर्घटनेत गजानन धमुने आणि त्यांचा मुलगा रोशन हे गंभीररीत्या भाजले होते. गजानन धमुने हे सुमारे ८० टक्के भाजले होते, तर रोशन धमुने सुमारे ४० टक्के भाजला होता. दोघांनाही तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू असतानाच आज उपचारादरम्यान दोघांनीही अखेरचा श्वास घेतला.
या घटनेमुळे धमुने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. गणेशोत्सवाच्या आनंदाच्या वातावरणात घडलेल्या या हृदयद्रावक दुर्घटनेने संपूर्ण बेळगाव शहरावर शोककळा पसरली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta