Sunday , September 20 2026
Breaking News

ऐन गणेशोत्सवात SA-1 परीक्षा; विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांची कोंडी

Spread the love

 

 

२१ सप्टेंबरपासून प्रथम सत्र परीक्षा; विसर्जनाच्या दिवशीही पेपर- दसरा सुट्टीच्या नियोजनामुळे शिक्षण विभागावर नाराजी

बेळगाव : दसरा सणाच्या सुट्टीच्या पार्श्वभूमीवर ऐन गणेशोत्सवात प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या प्रथम सत्र (SA-1) परीक्षांचे आयोजन करण्यात आले आहे. २१ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या परीक्षा १ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून, गणेशोत्सवाच्या उत्साहाच्या काळातच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अनेक शाळांमध्ये तोंडी परीक्षांनाही सुरुवात झाली आहे.

बेळगावचा गणेशोत्सव मुंबईच्या धर्तीवर भव्य स्वरूपात साजरा केला जातो. शहरातील विविध मंडळांकडून आकर्षक देखावे, भव्य गणेशमूर्ती आणि विद्युत रोषणाई केली जाते. सायंकाळनंतर गल्लोगल्ली गणेशदर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मात्र, याच काळात परीक्षा असल्याने विद्यार्थ्यांना या उत्सवाचा आनंद घेण्यावर मर्यादा येणार आहेत.

SA-1 परीक्षा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापनाच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाते. सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापनाच्या प्रक्रियेत लेखी परीक्षेलाही मोठे महत्त्व असून, विद्यार्थ्यांच्या एकूण मूल्यमापनातील सुमारे ५० टक्के भाग लेखी परीक्षेवर आधारित असल्याने या परीक्षेचा निकालावर परिणाम होतो. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि परीक्षेतील कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावपळ

परीक्षेच्या पार्श्वभूमीवर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शिक्षकांची धावपळ सुरू आहे. अध्यापनाबरोबरच विविध शैक्षणिक व अशैक्षणिक कामांचा ताण असताना परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांची पुरेशी उजळणी घेण्यासाठीही वेळ मिळालेला नाही. त्यातच गणेशोत्सवाच्या काळात परीक्षा घेण्याचे वेळापत्रक आल्याने शिक्षकांचीही कोंडी झाली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात अनेक विद्यार्थी कौटुंबिक कारणांमुळे किंवा सणाच्या कार्यक्रमांमुळे शाळेत गैरहजर राहतात. काही भागांत गणेशमूर्तींच्या आगमनानंतरही अनेक विद्यार्थी नियमित शाळेत दाखल झालेले नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांचे योग्य मूल्यमापन कसे होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

स्थानिक सणांचा विचार करून वेळापत्रकाची गरज

शिक्षण खात्याकडून राज्यस्तरावर परीक्षांचे वेळापत्रक निश्चित केले जाते. मात्र, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना स्थानिक पातळीवरील परिस्थितीचा विचार होणे आवश्यक असल्याचे शिक्षक व पालकांचे म्हणणे आहे. बेळगावसारख्या शहरात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत असल्याने परीक्षांचे नियोजन करताना स्थानिक सण-समारंभ आणि त्याचा विद्यार्थ्यांच्या उपस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेणे गरजेचे आहे.

विसर्जनाच्या दिवशीही परीक्षा!

विशेष म्हणजे, गणेश विसर्जनाच्या दिवशीही विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याने पालकांची चिंता वाढली आहे. बेळगावची विसर्जन मिरवणूक तब्बल ३५ तासांहून अधिक काळ चालते. त्यामुळे मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी, रस्ते बंद असणे आणि रात्री उशिरापर्यंत सुरू राहणारा उत्सव याचा परिणाम दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या परीक्षा उपस्थितीवर होण्याची शक्यता आहे.

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

२ ऑक्टोबरला गांधी जयंतीनंतर २१ ऑक्टोबरपर्यंत शाळांना दसरा सणाची सुट्टी असणार आहे. त्यामुळे गणेशोत्सव आणि विसर्जनाचा कालावधी संपल्यानंतर SA-1 परीक्षा घेण्यात यावी किंवा दसरा सुट्टीनंतर परीक्षा आयोजित करावी, अशी मागणी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांकडून होत आहे. सणासुदीच्या काळात परीक्षा घेण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थितीचा, उपस्थितीचा आणि स्थानिक परिस्थितीचा विचार करून परीक्षा वेळापत्रकात बदल करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *