Sunday , September 20 2026
Breaking News

खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा

Spread the love

 

शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन; कर्जमाफी, नुकसानभरपाईसह चारा-पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी

खानापूर : अपुऱ्या पावसामुळे तालुक्यात निर्माण झालेल्या दुष्काळसदृश परिस्थितीची तातडीने दखल घेऊन खानापूर तालुक्याचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याबाबत खानापूर तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने तसेच भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे शेतीसाठी पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, जनावरांसाठी चारा व पाण्याची समस्याही गंभीर बनली असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांनी संपूर्ण कर्जमाफी, पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देणे आणि कृत्रिम पावसासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. तसेच शेतीतील नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी तातडीने शासकीय पथक पाठवावे आणि बाधित शेतकऱ्यांसाठी मदत व नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी करण्यात आली.

जनावरांसाठी पुरेसा चारा उपलब्ध करून देण्याबरोबरच पाळीव प्राण्यांसाठी तात्पुरत्या पाण्याच्या टाक्या किंवा पाण्याच्या कुंड्यांची व्यवस्था करावी, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

या निवेदनाच्या प्रती बेळगाव जिल्हाधिकारी, कर्नाटकचे महसूल मंत्री जी. परमेश्वर, सार्वजनिक बांधकाम व जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी तसेच मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना देण्यात आल्या आहेत.

यावेळी शेतकरी प्रसाद पाटील, कल्लाप्पा लोहार, नितीन कुंभार आणि प्रशांत पाटील उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

२१ हजारांहून अधिक पेन्शनधारकांचे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी

Spread the love  वृद्ध, दिव्यांग व विधवा लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करून प्रलंबित पेन्शन तातडीने सुरू करण्याचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *