







सीमालढ्याला बळकटी देण्यासाठी महाराष्ट्रातून व्यापक जनजागृती करण्याचा निर्धार
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभाग आणि महाराष्ट्र एकीकरण समिती पुणे विभाग यांची संयुक्त बैठक बेळगाव येथील मराठा मंदिर येथे गुरुवारी, दिनांक १७ सप्टेंबर रोजी पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके होते.
सीमाप्रश्नाच्या लढ्याला महाराष्ट्रातून अधिक व्यापक पाठबळ मिळावे, तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांबाबत महाराष्ट्रात सातत्याने जनजागृती व्हावी, यासाठी बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
यावेळी शुभम शेळके म्हणाले, “सीमालढा केवळ सीमाभागापुरता मर्यादित न राहता तो महाराष्ट्रातूनही लढला गेला पाहिजे. महाराष्ट्रात सीमाप्रश्नाबाबत सातत्याने जागृती झाली पाहिजे. गेल्या सहा महिन्यांपासून पुणे विभाग समितीच्या कार्यकर्त्यांनी सीमालढ्यात सक्रिय सहभाग घेत सीमावासीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे असल्याचे दाखवून दिले आहे. भविष्यातही असेच पाठबळ देत महाराष्ट्र सरकारला सीमाप्रश्नाबाबत जागृत ठेवण्याचे आणि व्यापक जनजागृती करण्याचे काम पुणे विभागाने करावे. न्याय मिळेपर्यंत हा लढा सक्रियपणे सुरू ठेवला पाहिजे.”
युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी पुणे विभाग समितीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. अल्पावधीत पुणे विभागाने राबविलेल्या विविध उपक्रमांचे त्यांनी कौतुक करत कार्यकर्त्यांच्या योगदानाचा यथोचित सन्मान झाला पाहिजे, अशी भावना व्यक्त केली.
पुणे विभाग समितीचे विश्वनाथ पाखरे यांनी पुणे विभागाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध लोकप्रतिनिधींच्या भेटी घेऊन सीमाप्रश्न तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांशी संबंधित प्रश्नांबाबत निवेदने देऊन करण्यात आलेल्या जनजागृतीची माहिती बैठकीत दिली.
गणपती पाटील यांनी पुणे येथे सीमाप्रश्नाच्या संदर्भात आंदोलन हाती घेतल्यास पुणे विभाग समिती त्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करेल, असे आश्वासन दिले.
दरम्यान, महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यातून सीमालढ्याबाबत जनजागृतीच्या कार्याला सुरुवात करणाऱ्या पुणे विभाग समितीच्या पदाधिकाऱ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. “लढा नाहीतर गुलामीची सवय होईल” हे ब्रीदवाक्य असलेल्या मानचिन्हासह त्यांचा गौरव करण्यात आला.
बैठकीच्या शेवटी सरचिटणीस मनोहर हुंदरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी युवा समितीचे नगरसेवक व खजिनदार शिवाजी मंडोळकर, अशोक घगवे, इंद्रजित धामणेकर, सागर कणबरकर, रणजित हावळानाचे, निलेश काकतकर, सुरज जाधव, सुनील पाटील, मनोज बेळगुंदकर, वैभव कुट्रे, विनायक पवार, अभिजित मजुकर, राजू पाटील अभिषेक कारेकर, विशाल कुंडेकर तसेच पुणे विभागाचे सातेरी पाटील, वैराळ सुळकर, विठ्ठल पाखरे, भुजंग पाखरे, बाळकृष्ण पाटील आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta