







काँग्रेस सरकारच्या भूमिकेचा निषेध; जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य सरकारला निवेदन
बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या ‘वंदे मातरम्’ विषयीच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या बेळगाव ग्रामीण जिल्हा शाखेतर्फे शुक्रवारी बेळगाव शहरात भव्य मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढला. ‘वंदे मातरम्’च्या जयघोषासह देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी सामूहिकरीत्या संपूर्ण ‘वंदे मातरम्’ गीत गायले. यामध्ये उपस्थित नागरिकांनीही सहभाग घेतला.

मोर्चापूर्वी बेळगाव येथील भाजप जिल्हा कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत राज्य सरकारच्या भूमिकेचा निषेध करून आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात आली.
आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्य सरकारला निवेदन सादर करण्यात आले. ‘वंदे मातरम्’ हे स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणा देणारे राष्ट्रीय गीत असून, त्याचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी भूमिका भाजप कार्यकर्त्यांनी यावेळी मांडली.
या आंदोलनाला भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व्ही. नागराज, राज्यसभा सदस्य तथा बेळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य प्रमोद कोचेरी, कर्नाटक महिला मोर्चाच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत, माजी आमदार अरविंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष संजय कुबल, जिल्हा सचिव धनश्री सरदेसाई यांच्यासह ग्रामीण जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महिला मोर्चा आणि युवा मोर्चाचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने सहभागी झाले.

Belgaum Varta Belgaum Varta