







मेधा पाटकर यांच्या हस्ते होणार प्रकाशन; प्रबोधिनीच्या बैठकीत पूर्वतयारीचा आढावा
बेळगाव : पर्यावरणप्रेमी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी डॉ. शिवाजीदादा कागणीकर यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘सर्वोदयाचा वाटसरू’ या आत्मचरित्राचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. ४ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता गोगटे रंगमंदिर, बेळगाव येथे होणार आहे. राज्य मराठी विकास संस्था, मुंबई आणि गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या हस्ते आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आयोजकांची बैठक गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीचे सचिव सुभाष ओऊळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीत कार्यक्रमाचे नियोजन, प्रसिद्धी, निमंत्रण व्यवस्था, सभागृहाची तयारी, मान्यवरांचे स्वागत, कार्यक्रमाची रूपरेषा तसेच विविध जबाबदाऱ्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
डॉ. कागणीकर यांनी प्रदीर्घ सामाजिक कार्यातून जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, वृक्षलागवड, ग्रामीण विकास, शिक्षण आणि शाश्वत विकास या क्षेत्रांत योगदान दिले आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेचा प्रसार करताना पावसाचे पाणी अडवणे, भूजलपातळी वाढविणे आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत त्यांनी जनजागृती केली. ग्रामीण भागात पर्यावरणपूरक ऊर्जा उपलब्ध व्हावी, यासाठी गोबरगॅस प्रकल्पांनाही त्यांनी प्रोत्साहन दिले.
लाखो वृक्षांची लागवड, त्यांचे संगोपन व संवर्धन तसेच पर्यावरण आणि मानवी जीवनातील परस्परसंबंध याबाबत जनजागृती करणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग राहिला आहे. शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, पर्यावरणप्रेम, श्रमप्रतिष्ठा आणि समाजाप्रती बांधिलकी निर्माण व्हावी, यासाठीही त्यांनी विविध उपक्रम राबविले.
मानव, निसर्ग आणि समाज यांच्यातील समतोल साधण्याच्या त्यांच्या जीवनकार्याचा मागोवा ‘सर्वोदयाचा वाटसरू’ या आत्मचरित्रातून घेता येणार आहे. त्यामुळे हे आत्मचरित्र सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, शिक्षक आणि पर्यावरणप्रेमींसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे बैठकीत नमूद करण्यात आले.
प्रकाशन सोहळ्यास कर्नाटक व महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरणप्रेमी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
बैठकीस मालोजी अष्टेकर, सुरेश गडकरी, बी. बी. शिंदे, नीला आपटे, सविता पवार, ज्योती मजुकर, इंद्रजीत मोरे, गजानन सावंत, गौरी चौगुले, बसवंत शहापूरकर आणि धीरज राजपूत उपस्थित होते. उपस्थितांनी प्रकाशन सोहळा यशस्वी करण्यासाठी एकजुटीने कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

Belgaum Varta Belgaum Varta