







गोळाफेक स्पर्धेत तालुक्यात प्रथम क्रमांक; जिद्द व चिकाटीच्या जोरावर यश
बिजगर्णी : येथील पश्चिम विभाग शिक्षण मंडळ संचलित न्यू इंग्लिश हायस्कूलमधील इयत्ता दहावीचा विद्यार्थी श्रीनाथ चंद्रकांत निलजकर याने शिक्षण विभागातर्फे आयोजित ग्रामीण तालुकास्तरीय १७ वर्षांखालील वैयक्तिक गोळाफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
नेहरू क्रीडा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या ग्रामीण तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत श्रीनाथने उत्कृष्ट कामगिरी करत गोळाफेक प्रकारात अव्वल स्थान मिळविले. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्याने जिल्हास्तरावर मजल मारली.
ग्रामीण क्रीडाधिकारी साधना भद्री यांच्या हस्ते श्रीनाथचा गौरवपत्र व पदक देऊन सन्मान करण्यात आला.
त्याला क्रीडा शिक्षक ए. एम. दरेकर तसेच मुख्याध्यापक रमेश कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. श्रीनाथच्या या यशाबद्दल शिक्षकवृंद, संस्था पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमींनी त्याचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta