Monday , September 21 2026
Breaking News

अनावश्यक निर्बंध लादणार नाही; वेळेत गणेश विसर्जन पूर्ण करा : पोलीस आयुक्त प्रकाश निकम

Spread the love

 

बेळगाव : ऐतिहासिक बेळगाव गणेशोत्सवाच्या अंतिम चार दिवसांतील मिरवणूक व गणेशमूर्ती विसर्जन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरळीत पार पाडण्यासाठी पोलिस प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. यासंदर्भात शहर पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि. २१) पूर्वतयारी बैठक घेण्यात आली.

गणेशोत्सवाच्या अंतिम दिवसांतील गर्दीचे नियोजन, मिरवणूक मार्ग आणि विसर्जन व्यवस्था याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मार्गावरील लोंबकळणाऱ्या विद्युत तारा उंच करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे तसेच विसर्जन तलावांची स्वच्छता यासह विविध मूलभूत सुविधांबाबत सूचना मांडल्या.

यावेळी बोलताना पोलीस आयुक्त प्रकाश निकम यांनी, उत्सवाच्या काळात नागरिकांवर अनावश्यक निर्बंध लादले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, गणेश मंडळांनी मिरवणूक व विसर्जनाची प्रक्रिया निर्धारित वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन त्यांनी केले. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस विभाग २४ तास सज्ज राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

उपपोलीस आयुक्त नारायण बरमणी यांनी गणेश मंडळांनी पोलिस प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन केले. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी ओळखून कोणत्याही अनुचित प्रकाराला वाव न देता गणेशोत्सव शांतता व सलोख्याने पार पाडावा, असे त्यांनी सांगितले.

बैठकीला गणेश महामंडळाचे अध्यक्ष व पदाधिकारी, डीसीपी निरंजन राजे अरस यांच्यासह पोलीस व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

चव्हाट गल्ली स्फोट प्रकरणाला धक्कादायक वळण : स्फोटापूर्वी बकेट घेऊन आलेला अनोळखी व्यक्ती सीसीटीव्हीत कैद

Spread the love पोलिस तपासाला नवा धागा बेळगाव : गणेशोत्सवाच्या उत्साहात असलेल्या एका कुटुंबावर काळाचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *