Monday , September 21 2026
Breaking News

मनापासून केलेली भक्ती हाच खरा देव; अर्जुनराव चौगुले

Spread the love

बेळगाव : मनापासून केलेली भक्ती हाच खरा देव आहे. केवळ माणसांतच नव्हे, तर पशू, पक्षी आणि प्राण्यांमध्येही देव आहे, असा मानवतेचा संदेश संतांनी दिला, असे प्रतिपादन निवृत्त माध्यमिक शिक्षक अर्जुनराव चौगुले यांनी केले.

राज्य विकास मराठी संस्था, मुंबईच्या प्रेरणेने प्रगतिशील लेखक संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने रविवारी (२० सप्टेंबर) आयोजित ‘जागर विवेकाचा’ कार्यक्रमात ‘मराठी संत व अंधश्रद्धा निर्मूलन’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर अध्यक्षस्थानी होते.

अंनिसचे कार्याध्यक्ष शंकरराव चौगुले यांनी म्हटलेल्या अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रारंभी अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांच्या हस्ते पुस्तक देऊन व्याख्याते अर्जुनराव चौगुले यांचा सत्कार करण्यात आला.

अर्जुनराव चौगुले यांनी व्याख्यानातून संत ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम, गोरा कुंभार, चोखोबा, नरहरी सोनार आदी संतांच्या जीवनकार्याचा परिचय करून देत त्यांनी अंधश्रद्धेविरोधात केलेल्या कार्याची माहिती दिली.

अध्यक्षीय भाषणात कृष्णा शहापूरकर यांनी ज्ञानेश्वर-तुकारामांपासून गाडगेबाबांपर्यंतच्या संतांनी समाजाला जोडण्याचे कार्य केले. मात्र, आजच्या काळातील बागेश्वरबाबा, संग्राम भंडारे यांच्यासारखे स्वयंघोषित संत तसेच काही कीर्तनकार राजकीय पक्षांची ‘सुपारी’ घेऊन समाजात फूट पाडण्याचे काम करत आहेत, अशी टीका केली.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यवाह जोतिबा अगसीमनी यांनी प्रास्ताविक केले, तर शिवाजी हसनेकर यांनी आभार मानले.

गिरीश कॉम्प्लेक्समधील शहीद भगतसिंग सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

उत्तर परिक्षेत्राचे आयजीपी संदीप पाटील यांची ‘बेळगावचा राजा’ला सदिच्छा भेट

Spread the love  बेळगाव : उत्तर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी चव्हाट गल्ली येथील …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *