








सौन्दत्ती : सौन्दत्ती तालुक्यातील प्रसिद्ध यल्लम्मा डोंगरावर येथे अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी तपासणी मोहीम राबविण्यात आली. या कारवाईत विविध अनियमितता आढळून आल्याने ९ दुकानदारांसह मंदिरातील दोन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
तपासणीदरम्यान डोकेदुखी, सर्दी, उलटी, जुलाब आदी आजारांसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध औषधांच्या गोळ्या आढळल्या. तसेच मुदतबाह्य शीतपेयांच्या बाटल्या आणि खाद्यपदार्थांची पाकिटे जप्त करण्यात आली.
यल्लम्मा डोंगरावर येथील व्यापारी संकुलातील काही हॉटेल्स व मिठाईच्या दुकानांमध्ये स्वच्छतेचा अभाव आढळून आला. संबंधित दुकानदारांना नोटिसा देऊन खाद्यपदार्थांचा दर्जा आणि स्वच्छता राखण्याच्या सूचना करण्यात आल्या.
अनधिकृत व्यावसायिक हालचालींवर योग्य कारवाई न केल्याने कर्तव्यात हलगर्जीपणा केल्याच्या आरोपावरून मंदिरातील दोन कर्मचाऱ्यांनाही कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्या. संबंधित प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांकडूनही स्पष्टीकरण मागविण्यात आले आहे.
कठोर कारवाईचा इशारा
यल्लम्मा डोंगरावर सुमारे २१५ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांना सुरुवात असून, ‘स्वच्छ यल्लम्मा डोंगर’साठी आवश्यक मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.
यल्लम्मा डोंगरावर येथे कोट्यवधी भाविक श्रद्धेने येतात. भाविकांची फसवणूक किंवा त्यांच्यावर अन्याय होऊ नये, यासाठी कडक उपाययोजना करण्यात येतील. भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण करणाऱ्या अनियमिततेविरोधात तपासणी सुरूच राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. कर्तव्यात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल. आवश्यकतेनुसार फौजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

Belgaum Varta Belgaum Varta