








बेळगाव : टिळकवाडी येथील सुभाषचंद्र बोस लेले मैदानावर सार्वजनिक शिक्षण खात्याच्या वतीने आयोजित बेळगाव शहर तालुकास्तरीय मुलांच्या फुटबॉल स्पर्धेत अनगोळ येथील संत मीरा शाळेने बलाढ्य सेट पाल्स शाळेचा पराभव करीत विजेतेपद पटकाविले.
१७ वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्य सामन्यात संत मीरा शाळेने भरतेश इंग्लिश मीडियम स्कूलचा ३-० असा पराभव केला. विजयी संघाकडून संचित धामणेकर, श्रेयस चंदन व हरीष पिरजादे यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात सेट पाल्स शाळेने कनक मेमोरियल स्कूलचा ४-० असा पराभव केला. सेट पाल्सकडून आराध्या नाकाडी व सकलेन मुल्ला यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
अंतिम सामना संत मीरा व सेट पाल्स या संघांत झाला. पहिल्या सत्रात दोन्ही संघांना गोल करण्यात यश आले नाही. दुसऱ्या सत्रात सेट पाल्सला पेनल्टी शूटआउटची संधी मिळाली आणि त्यावर गोल करीत त्यांनी १-० अशी आघाडी घेतली. सामना संपण्यास अवघी दोन मिनिटे शिल्लक असताना संत मीराच्या रत्नाकर गौतमने गोल करीत सामना १-१ असा बरोबरीत आणला.
निर्धारित वेळेत सामना १-१ असा बरोबरीत राहिल्याने पंच कौशिक पाटील यांनी पेनल्टी शूटआउटचा निर्णय घेतला. त्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी तीन गोल केले. त्यानंतर सडन डेथचा अवलंब करण्यात आला. यात संत मीरा शाळेने सेट पाल्सचा ६-५ असा पराभव करीत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
विजयी संत मीरा संघाकडून समर्थ पानारी, रक्षित रामगोंडा, रेहान अख्तर, रत्नाकर गौतम व अनिरुद्ध हलगेकर यांनी पेनल्टी शूटआउटमध्ये गोल केले. सेट पाल्सकडून अब्दुल मतीन सय्यद, नवीन पत्की, सुमित गंगेकर व आराध्या नाकाडी यांनी गोल केले. सकलेन मुल्ला व हर्षित रेवणकर यांना गोल करण्यात यश आले नाही.
या विजयामुळे संत मीरा शाळेचा संघ आगामी जिल्हास्तरीय फुटबॉल स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. बक्षीस वितरण समारंभात प्रमुख पाहुणे नागराज भगवण्णावर, अँथोनी डिसोझा, जयसिंग धनाजी व बापू देसाई यांच्या हस्ते विजेत्या संघाला चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
सेट पाल्सचा सलग तिसरा पराभव
मागील दोन वर्षांत सार्वजनिक शिक्षण खात्याच्या तालुकास्तरीय स्पर्धेत संत मीरा शाळेने बलाढ्य सेट पाल्स संघाला सलग दोन वेळा पराभूत केले आहे. तसेच फादर एड फुटबॉल स्पर्धेतही संत मीरा संघाने सेट पाल्सला पराभवाचा धक्का दिला होता. या विजयामुळे संत मीरा शाळेच्या फुटबॉल संघातील खेळाडूंचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta