







बेळगाव : चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा क्रमांक ५ मध्ये माजी विद्यार्थी संघाच्या वतीने कै. अॅड. किसनराव यळ्ळूरकर यांच्या स्मरणार्थ गुणवत्ता पारितोषिक वितरण समारंभ सोमवारी (दि. २१) उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. अमर यळ्ळूरकर होते. प्रमुख पाहुणे म्हणून तुकाराम को-ऑप. बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे, दीपक किल्लेकर, शितल यळ्ळूरकर, प्रवीण जाधव, श्रीकांत कडोलकर, प्रा. एम. एम. जाधव, उत्तम कामुले आदी उपस्थित होते.
इयत्ता पहिली ते आठवीतील प्रथम तीन क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके व रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. तसेच शाळेची विद्यार्थिनी कु. स्वरानी प्रसाद गोरल हिने जिल्हास्तरीय ज्युडो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचा विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी मान्यवरांनी शाळेतील शिक्षकांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. मुख्याध्यापक मुचंडीकर सर व सर्व शिक्षक शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी विशेष प्रयत्न करीत असून, विद्यार्थ्यांनी यापुढेही अधिक चांगले यश संपादन करण्यासाठी मेहनत घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
प्रास्ताविकात पाटील सर यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील राहतील, तसेच शाळेचा नावलौकिक आणि विद्यार्थीसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा विश्वास व्यक्त केला. माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दीपक किल्लेकर यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय भाषणात अॅड. अमर यळ्ळूरकर यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्याने त्यांच्यात आत्मविश्वास व उत्साह वाढतो, असे सांगितले. आपल्या वडिलांचे स्वप्न पुढे नेत गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत व प्रोत्साहन देण्यासाठी आपण कायम पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
प्रकाश मरगाळे यांनी कै. किसनराव यळ्ळूरकर यांच्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवून स्वतःची गुणवत्ता वाढवावी, आई-वडील व शिक्षकांचा नावलौकिक करावा, तसेच जिद्द व मेहनतीच्या जोरावर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवून शाळेचे नाव उज्ज्वल करावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. ए. माळी सर यांनी केले. आभार नाथबुवा सर यांनी मानले.

Belgaum Varta Belgaum Varta