








बेळगाव : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा कडक बंदोबस्त असतानाही गुन्हेगारी घटनांना आळा बसताना दिसत नाही. रविवारी रात्री मंडोळी रोडवर एका तरुणाला फोन करून बोलावून घेतल्यानंतर त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री सुमारे ९ ते १० वाजण्याच्या दरम्यान तरुणाला मंडोळी रोडवर बोलावून घेण्यात आले. तेथे दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.
सदर तरुण यापूर्वी जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती आहे. जुन्या वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त एन. व्ही. बरमणी, एसीपी मल्लणगौडा नायकरा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
याप्रकरणी टिळकवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. सीसीटीव्ही फुटेजसह अन्य पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.

Belgaum Varta Belgaum Varta