








बेळगाव : राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या (आरसीयू) निधीतील ३२ लाख रुपयांहून अधिक रक्कम बेकायदेशीररीत्या स्वतःच्या बँक खात्यांमध्ये वर्ग करून आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून काकती पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. मुरगेश एच. एम., महेश वीरेश वाली, संदीप बुर्ली आणि रामू यल्लाप्पा हंचिनाळ अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौघांचीही न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली असून, त्यांना हिंडलगा कारागृहात ठेवण्यात आले आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २०२० ते २०२३ या कालावधीत विद्यापीठाच्या आर्थिक व्यवहारांमध्ये अनियमितता करून ३२ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम कथितरीत्या स्वतःच्या खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. हे प्रकरण उशिराने उघडकीस आल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी सुरू केली.
याप्रकरणी विद्यापीठाचे उपकुलसचिव डी. के. कांबळे यांनी ८ सप्टेंबर रोजी काकती पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर चौघेही फरार झाले होते.
पोलिस निरीक्षक सुरेश शिंगी यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक मंजुनाथ नाईक, मृत्युंजय मठद आणि त्यांच्या पथकाने हुबळी, विजयपूर व बागलकोट जिल्ह्यांत शोधमोहीम राबवली. अखेर पोलिसांनी चौघांना ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास काकती पोलिस करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta