








तलावांसह मिरवणूक मार्गावरील कामे अंतिम टप्प्यात; अधिकाऱ्यांना वेळेत तयारी पूर्ण करण्याच्या सूचना
बेळगाव : प्रतिनिधी
गणेशमूर्ती विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव महानगरपालिका आणि विविध विभागांकडून सुरू असलेल्या अंतिम टप्प्यातील तयारीची महापौर प्रीती कामकर, उपमहापौर हणमंत कोंगाळी आणि पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी अधिकाऱ्यांच्या पथकासह पाहणी केली.
कपिलेश्वर मंदिर परिसरातील जुना व नवा तलाव, जक्केरीहोंड, किल्ला तलाव यासह पालिका हद्दीतील विविध विसर्जन तलावांना भेट देऊन स्वच्छता, नागरिकांसाठीच्या सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला. तसेच गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गाची पाहणी करून सुरू असलेल्या रस्ता दुरुस्तीच्या कामांची माहिती घेण्यात आली.
पाहणीनंतर महापौर प्रीती कामकर यांनी, गेल्या काही दिवसांपासून विविध कामे सुरू असून उर्वरित कामेही तातडीने पूर्ण करावीत. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही आणि विसर्जन प्रक्रिया सुरळीतपणे पार पडेल, याची दक्षता घेण्याच्या सूचना पालिका, एल अँड टी तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
उपमहापौर हणमंत कोंगाळी यांनी यापूर्वी अनेक बैठका घेऊन विविध विभागांना जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्याचे सांगितले. त्यानुसार कोणतीही कामे प्रलंबित असल्यास त्याकडे तातडीने लक्ष देऊन वेळेत तयारी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
पालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी विसर्जन तलाव परिसरात क्रेन, मंडप, ध्वनिक्षेपक, पिण्याचे पाणी यांसह आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या. तसेच पोलीस, जीव रक्षक पथक आणि इतर संबंधित विभागांमध्ये योग्य समन्वय ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले.
शुक्रवारी होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मोठ्या संख्येने नागरिक येण्याची शक्यता असल्याने गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी तसेच नागरिकांनी पोलीस आणि इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांना शांतता, संयम व शिस्तीने सहकार्य करावे आणि विसर्जन मिरवणूक यशस्वी करावी, असे आवाहन महापौर, उपमहापौर व आयुक्तांनी केले.
यावेळी स्थायी समिती अध्यक्ष राजू भातकांडे, नितीन जाधव, इतर नगरसेवक, महानगरपालिकेचे अभियंते तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta