








गर्दी नियंत्रणासाठी भव्य प्रेक्षक गॅलरी; सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थेवर प्रशासनाचा भर
बेळगाव : गणेशभक्तांच्या उत्साहाचा कळस गाठणाऱ्या ऐतिहासिक गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी बेळगाव महानगरपालिका प्रशासन सज्ज झाले आहे. शुक्रवार, २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या विसर्जन मिरवणुकीत शहरासह परिसरातील हजारो नागरिक सहभागी होणार असल्याने गर्दीचे नियोजन आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले आहे. मिरवणुकीतील प्रमुख केंद्र असलेल्या धर्मवीर संभाजी चौकात भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
गणेश मंडळांचे आकर्षक देखावे, नेत्रदीपक विद्युत रोषणाई, ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे विसर्जन मिरवणुकीला दरवर्षी मोठी रंगत येते. हा उत्सव डोळ्यांत साठविण्यासाठी शहरासह आसपासच्या परिसरातून मोठ्या संख्येने नागरिक बेळगावात दाखल होतात. परिणामी मिरवणूक मार्गावर होणारी गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने यंदा विशेष खबरदारी घेतली आहे.
गॅलरीतून मिरवणुकीचा सुरक्षित आनंद
धर्मवीर संभाजी चौकात उभारण्यात येणाऱ्या भव्य प्रेक्षक गॅलरीमुळे नागरिकांना रस्त्यावर गर्दी न करता सुरक्षितपणे मिरवणूक पाहता येणार आहे. चौक परिसरात मंडप उभारण्याचे कामही सुरू असून नागरिकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
गर्दीवर नियंत्रण; वाहतुकीचेही नियोजन
विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने गर्दी नियंत्रण, वाहतूक नियमन आणि नागरिकांची सुरक्षितता यासाठी संबंधित यंत्रणांकडून तयारी करण्यात येत आहे. मिरवणूक मार्गावरील संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाययोजना करण्यावर भर देण्यात आला आहे.
गणेशोत्सवाचा उत्साह कायम ठेवत मिरवणूक शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी, यासाठी नागरिकांनी प्रशासन व पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे. रस्त्यावर अनावश्यक गर्दी करून वाहतुकीला अडथळा निर्माण करू नये. मिरवणूक पाहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेची काळजी घेत प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
भव्य मिरवणूक, हजारोंची गर्दी आणि उत्सवाचा जल्लोष या पार्श्वभूमीवर धर्मवीर संभाजी चौकातील प्रेक्षक गॅलरी यंदाच्या विसर्जन मिरवणुकीचे महत्त्वाचे आकर्षण ठरणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta