








बेळगाव : शहरात उत्साहात सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या विसर्जन मिरवणुका शांततेत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडाव्यात, यासाठी पोलीस यंत्रणा पूर्णपणे सज्ज झाली आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली असून, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्क राहून कर्तव्य बजावावे, अशा सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
विसर्जन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आर. हितेंद्र, आयपीएस यांनी गुरुवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला.
संभाव्य अनुचित घटना टाळण्यासाठी आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासोबतच विसर्जन मिरवणुकीदरम्यान नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. संवेदनशील ठिकाणी विशेष लक्ष देत आवश्यक त्या ठिकाणी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्याबाबतही बैठकीत चर्चा झाली.
या बैठकीला बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त प्रकाश निकम तसेच उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर तयार करण्यात आलेल्या सुरक्षा आराखड्याची माहिती घेऊन आवश्यक त्या उपाययोजनांबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
विसर्जन मिरवणुका शांततेत पार पाडण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले.

Belgaum Varta Belgaum Varta