








आज दुपारी २ पासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत निर्बंध; अवजड वाहनांना शहरात प्रवेशबंदी
बेळगाव : अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल केले आहेत. आज दि. २५ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजल्यापासून विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत हे बदल लागू राहणार आहेत. नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीचा मुख्य मार्ग चन्नम्मा सर्कल–कॉलेज रोड–पिंपळ कट्टा–नरगुंदकर भावे चौक–मारुती गल्ली–हुतात्मा चौक–रामदेव गल्ली–समादेवी गल्ली–एन.डी. सिग्नल–धर्मवीर संभाजी चौक–रामलिंगखिंड गल्ली–टिळक चौक–हेमू कलानी चौक–शनी मंदिर–कपिलेश्वर उड्डाणपूल–कपिलेश्वर रोड–कपिलेश्वर तलाव असा निश्चित करण्यात आला आहे.
खानापूरकडे जाण्यासाठी पर्यायी मार्ग
किला तलाव, सम्राट अशोक चौक, आरटीओ सर्कल आणि चन्नम्मा सर्कल मार्गे खानापूरकडे जाणाऱ्या वाहनांनी संगोळी रायन्ना चौक–एसपी ऑफिस रोड–कृष्णदेवराय चौक–सदाशिवनगर–लक्ष्मी कॉम्प्लेक्स–विश्वेश्वरय्या नगर–बाजी प्रभू मार्ग–गांधी सर्कल–शौर्य चौक–केंद्रीय विद्यालय क्रमांक २–शर्कत पार्क–सिंझो बंगला–सेंट पॉल्स हायस्कूल–मिलिटरी महादेव मंदिर क्रॉस मार्गे खानापूर रस्त्याला मिळावे.
शहरात येणाऱ्या वाहनांसाठी मार्ग बदल
गोगटे सर्कल रेल्वे ओव्हरब्रिजमार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांनी गोगटे सर्कलवरून डावीकडे वळून काँग्रेस रोड–मिलिटरी महादेव मंदिर–सेंट पॉल्स हायस्कूल–सिंझो बंगला–शर्कत पार्क–केंद्रीय विद्यालय क्रमांक २–शौर्य चौक–हिंडलगा गणेश मंदिर–हनुमाननगर डबल रोड–बॉक्साईट रोड मार्गाचा वापर करावा.
गोगटे सर्कलहून रेल्वे स्टेशन, हेड पोलिस ऑफिस आणि जुन्या पीबी रोडकडे जाणारी वाहतूक गोवावेस–नाथाजी नगर सर्कल–खासबाग बसवेश्वर सर्कल–संभाजी गल्ली मार्गे वळवण्यात आली आहे.
नाथ पै सर्कलहून बँक ऑफ इंडिया आणि एसपीएम रोडकडे जाणारी वाहने खासबाग बसवेश्वर सर्कल आणि संभाजी गल्ली मार्गे जातील.
जीजामाता सर्कलहून देशपांडे पेट्रोल पंप, नरगुंदकर भावे चौक आणि पाटील गल्लीकडे जाणाऱ्या वाहनांनी मध्यवर्ती बस स्थानक किंवा व्हॉटसन शोरूममार्गे जुन्या पीबी रोडचा वापर करावा.
अवजड वाहनांना प्रवेशबंदी
विसर्जन मिरवणुकीच्या कालावधीत सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना शहरात प्रवेश करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
तसेच काकतीवेस रोड, गणपती गल्ली, चन्नम्मा सर्कल ते मुख्य मिरवणूक मार्ग, नरगुंदकर भावे चौक, मारुती गल्ली, हुतात्मा चौक, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, यंदे खूट, धर्मवीर संभाजी चौक, रामलिंगखिंड गल्ली, टिळक चौक, हेमू कलानी चौक, शनी मंदिर, कपिलेश्वर उड्डाणपूल तसेच कपिलेश्वर मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या रस्त्यांवर वाहन पार्किंगला पूर्णतः बंदी राहणार आहे.
नागरिकांसाठी पार्किंगची व्यवस्था
नागरिकांसाठी देशपांडे वाडा ते गांधी सर्कलदरम्यानचा वेंगुर्ला रोड, डेअरी फार्म परिसर, महिला पोलिस ठाण्यामागील मोकळी जागा, सरदार मैदान, न्यायालय परिसर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, भरतेश शिक्षण संस्थेसमोरील कॅन्टोन्मेंट पार्किंग, संभाजी उद्यान आणि जुन्या भाजी मार्केटजवळील मुजावर कोर्ट परिसर येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि निश्चित केलेल्या पार्किंग ठिकाणीच वाहने उभी करावीत, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta