Sunday , October 4 2026
Breaking News

मार्कंडेय साखर कारखाना दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय

Spread the love

 

नोव्हेंबरअखेर गाळपाचे नियोजन

बेळगाव : काकती येथील बंद असलेला मार्कंडेय साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारखाना दहा वर्षांच्या भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. निधी उपलब्ध होताच दुरुस्ती आणि यंत्रसामग्रीशी संबंधित कामांना गती देऊन नोव्हेंबरअखेर गाळप हंगाम सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

अध्यक्ष अविनाश पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कारखान्याची सर्वसाधारण सभा झाली. उपाध्यक्ष बसवंत मायाण्णाचे, कार्यकारी संचालक एम. डी. झुबीडल्ला, आर. आय. पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असून, निधी येत्या चार ते आठ दिवसांत उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. निधी उपलब्ध झाल्यानंतर दुरुस्तीची कामे दिवस-रात्र सुरू ठेवून निर्धारित वेळेत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

कारखान्याच्या ताब्यात सुमारे ११३ एकर जमीन आहे. या जमिनीसाठी यापूर्वी ३० वर्षांचा करार करण्यात आला होता. संबंधित लीजचा कालावधी यावर्षी संपल्याने तो वाढविण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

दरम्यान, कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने प्राथमिक कामे सुरू झाली आहेत. सध्या सुमारे ६० स्थानिक कामगार कार्यरत असून, कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी आणखी १०० कामगारांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

कारखाना सुरू झाल्यानंतर ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचे बिल वेळेवर अदा करण्यात येईल, अशी ग्वाही पदाधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू होण्याच्या निर्णयाकडे ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

कार्यकारी संचालक एम. डी. झुबीडल्ला यांनी स्वागत केले. मनोहर हुक्केरीकर, मनोज पावशे, अरुण कटांबळे, आर. आय. पाटील, यल्लाप्पा बेळगावकर, भरत शानभाग, चेतन कांबळे आदी उपस्थित होते. सुरेश अष्टेकर यांनी सूत्रसंचालन केले.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *