








विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; १७ विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव
बेंगळुरू : कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद, कलबुरगी आणि राज्य मराठी विकास संस्था, मुंबई तसेच आर्ट एब्स्ट्रेक्ट क्लासेस यांच्या संयुक्त विद्यमाने बेंगळुरूच्या व्हाईटफिल्ड परिसरात ‘इको फ्रेंडली गणेश मूर्तीकला कार्यशाळे’चे आयोजन करण्यात आले. १५ ते २९ ऑगस्टदरम्यान झालेल्या या कार्यशाळेला विविध वयोगटातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
गुळगुळीत लालमातीपासून श्रीगणेशाची मूर्ती साकारण्याची कला विद्यार्थ्यांनी या कार्यशाळेत आत्मसात केली. विशेष म्हणजे, ४ ते ७ वर्षे वयोगटातील चिमुकल्यांनीही अत्यंत उत्साहाने मूर्तीकलेचे धडे गिरविले. माहिती-तंत्रज्ञानाच्या युगातील बेंगळुरूसारख्या शहरात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
बेंगळुरू हे अमराठीबहुल शहर असतानाही या उपक्रमाला बहुभाषिक पालक आणि विद्यार्थ्यांचा सहभाग लाभला. त्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मितीचा संदेश भाषेच्या सीमा ओलांडून पोहोचल्याचे दिसून आले.
कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद साहित्याबरोबरच कला आणि सांस्कृतिक उपक्रमांनाही प्रोत्साहन देत आहे. या कार्यशाळेत सहभागी अपूर्वा अय्यर, आव्या भंडारी, अन्वी मालशेट्टी, आदित राठोड, इंचारा किरन, धृति माथुर, कृतार्थ धारीवाल, नयजा रंजन, प्राशी गोयल, रायन निर्मल, स्मेरा शाह, श्रेयांवी शर्मा, सात्विक नायक, विहसित भारद्वाज, मिशी, वेदिका नगलिया आणि डॉ. नम्रता कुलकर्णी यांना कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
पर्यावरणपूरक उपक्रम यशस्वी करण्यासाठी कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेचे राज्याध्यक्ष गुरय्या स्वामी, बेंगळुरू विभागाध्यक्ष डॉ. व्यंकटेश देवनपल्ली तसेच परिषदेच्या इतर पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य आणि मार्गदर्शन लाभले.
— दिपाली वझे
माजी अध्यक्षा, क.रा.म.सा.प., बेंगळुरू विभाग.

Belgaum Varta Belgaum Varta