








हलगा : राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान (एनआरएलएम) अंतर्गत हलगा (ता. खानापूर) येथे संजीवनी संघाच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत ईओ रमेश मेत्री होते. यावेळी जीपीएलएफ अध्यक्षा तथा एनआरएलएम तालुका स्तर सचिव आणि हलगा संजीवनी संघाच्या अध्यक्षा प्रवीणा सुनील फटाण, पीडीओ निंगाप्पा आस्की, तालुका पंचायत कर्मचारी, पंचायत पदाधिकारी, संजीवनी संघाचे पदाधिकारी तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना ईओ रमेश मेत्री सरांनी उपस्थित महिलांना स्वउद्योगाचे महत्त्व, आत्मनिर्भरतेची गरज आणि महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे महत्त्व समजावून सांगितले. महिलांनी उपलब्ध संधींचा योग्य उपयोग करून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी एनआरएलएम तालुका स्तर सचिव तथा हलगा संजीवनी संघाच्या अध्यक्षा प्रवीणा सुनील फटाण यांनी महिलांशी संवाद साधला. संजीवनी संघाच्या माध्यमातून महिलांची एकजूट अधिक मजबूत करून त्यांना स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहन त्यांनी केले. महिलांनी विविध शासकीय योजनांचा लाभ घेत संघटितपणे प्रगती साधावी, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
पीडीओ निंगाप्पा आस्की सरांनी शासनाच्या विविध योजना व उपक्रमांची माहिती उपस्थित महिलांना दिली. उपलब्ध शासकीय योजनांचा लाभ घेऊन महिलांनी आपल्या कुटुंबासह गावाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणाबाबत आपले विचार मांडत, महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन विविध क्षेत्रांत सक्रिय सहभाग घ्यावा, यावर मार्गदर्शन केले.
तालुका पंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने सचिता पाटील यांनी कार्यक्रमात सहकार्य केले.
कार्यक्रमाच्या समारोपावेळी उपस्थित महिलांना लिंबाची रोपे भेट देण्यात आली. महिला सक्षमीकरणासोबत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. रोपांची योग्य काळजी घेऊन त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन करण्यात आले.
महिला सक्षमीकरण, स्वावलंबन, आत्मनिर्भरता, संघटन आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत हा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.

Belgaum Varta Belgaum Varta