








बेळगांव : सहकार क्षैत्रामुळेच व्यक्तीबरोबरच देशाचाही विकास झाला, असे मत बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी व्यक्त केले.
येथील कॉलेज रोडवरील सुप्रसिद्ध विवेकानंद मल्टीपर्पज सौहार्द को-ऑप. सोसायटीची पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (२३ सप्टेंबर) रोजी उत्साहात पार पडली. यावेळी शहापूरकर बोलत होते. चेअरमन कुमार पाटील अध्यक्षस्थानी होते.
वैष्णवी नाडगौडा हिच्या गणेश वंदनाने सभेस प्रारंभ झाला. चेअरमन व संचालकांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाल्यावर व्हाइस चेअरमन प्रा. दत्ता नाडगौडा यांनी प्रास्ताविक केले. स्वामी विवेकानंद यांच्या विचारांने सोसायटी वाटचाल करीत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोसायटीच्या स्थापनेपासून गेल्या पंधरा वर्षातील प्रगतीचा आढावा घेतला.
चेअरमन कुमार पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत करताना सोसायटीच्या प्रगतीस मदत केलेल्या ठेवीदार, कर्जदार व सभासदांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
यानंतर सेक्रेटरी पद्मा बाडकर यांनी १४ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त सादर केले. सविता चव्हाण यांनी २०२५-२०२६ सालचा वार्षिक अहवाल, ताळेबंद व नफा तोटा पत्रक आणि संचालक मंडळाने शिफारस केलेली नफा विभागणी यांचे वाचन केले. सोनम मंगणाकर यांनी आर्थिक प्रगतीची आकडेवारी सादर केली. अर्चना दरवंदर यांनी २०२६-२०२७ सालचे अंदाजपत्रक सादर केले. प्रियांका संकेत कुलकर्णी यांनी २०२५-२०२६ सालचा लेखा परिक्षकांच्या अहवालाचे वाचन केले तर संचालिका पूजा पाटील यांनी २०२६-२०२७ सालाकरिता लेखा परिक्षकाची नियुक्ती करण्याबाबत सूचना मांडली. या सर्व विषयांना सर्वानुमते मंजुरी देण्यात आली. ज्येष्ठ संचालक अविनाश कुलकर्णी यांनी प्रशासकीय कामकाज याविषयी मार्गदर्शन केले.
जामीनदाराची जबाबदारी याविषयी कर्जवसुली अधिकारी विलास पेडणेकर यांनी मराठीत व अनंता शेट यांनी कन्नडमध्ये मार्गदर्शन केले.
यानंतर पिग्मी संकलक प्रविण पाटील, अनंत कुलकर्णी, अंजली देवळी, मनोहर लोकूरकर, चंद्रकांत ढवळे यांचा तसेच सेक्रेटरी पद्मा बाडकर, अर्चना दरवंदर, सोनम मंगणाकर, सविता चव्हाण विलास पेडणेकर व रोहित दरवंदर या कर्मचाऱ्यांचा व गायिका वैष्णवी नाडगौडा, सूत्रसंचालिका प्रिया कवठेकर यांचा भेटवस्तू देऊन संचालकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कृष्णा शहापूरकर यांनी आपल्या भाषणात उद्योग, कृषी, शिक्षण, व्यापार या क्षेत्राच्या विकासासाठी सहकारी चळवळीने मोठे योगदान दिले असल्याचे सांगितले. तसेच कर्ज पुरवठा व कर्जवसुली या दोन मुद्यांकडे संचालक मंडळ व कर्मचारी वर्गाने विशेष लक्ष देण्याची गरज त्यांनी प्रतिपादन केली.
सभासद सुहास गुर्जर व किशोर काकडे यांनी उपयुक्त सूचना केल्या. तसेच बॅंक कर्मचारी रुपाली हळदणकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या. कर्मचारी रोहित दरवंदर यांनी आभार मानले. वंदे मातरमने सभेची सांगता झाली. गुडसशेड रोड येथील जगन्नाथराव जोशी सभागृहात झालेल्या या सभेस सभासद, ठेवीदार, कर्जदार व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta