Sunday , October 4 2026
Breaking News

कुद्रेमानीतील ‘भूवाची पाऊले’ देवस्थानावर ग्रामस्थांची श्रद्धा फळली

Spread the love

 

पंचक्रोशीत वरुणराजाची हजेरी; शेतकरी सुखावला

कुद्रेमानी : कुद्रेमानी येथील श्रद्धास्थान असलेल्या ‘भूवाची पाऊले’ देवस्थानावर ग्रामस्थांनी केलेली पूजा, अभिषेक आणि पावसासाठी घातलेले साकडे यानंतर पंचक्रोशीत वरुणराजाने हजेरी लावल्याने शेतकरी बांधवांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आहे.

पावसाने अनेक दिवस दडी मारल्याने कुद्रेमानीसह बेळगाव आणि चंदगड तालुक्यातील शेतकरी चिंतेत होते. पावसाअभावी पिके सुकण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या पार्श्वभूमीवर कुद्रेमानी येथील ‘मानीच्या कावलातील भूवाची पाऊले’ या पारंपरिक श्रद्धास्थानावर रविवार, दि. २७ सप्टेंबर रोजी ग्रामस्थांनी विधीवत पूजा-अर्चा केली होती. दूध, दही, तूप व पाण्याने अभिषेक करून वरुणराजाने कृपा करावी, पाऊस पडावा आणि बळीराजाची पिके वाचावीत, यासाठी ग्रामस्थांनी साकडे घातले होते.

गावकऱ्यांच्या या श्रद्धेनंतर मंगळवार, दि. २९ सप्टेंबर रोजी दुपारी ४.३० वाजल्यानंतर बेळगाव व चंदगड तालुक्यात अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावली. कुद्रेमानीसह पंचक्रोशीत पावसाच्या सरी बरसल्याने शेतकरी सुखावला. पिकांना या पावसाने मोठा दिलासा मिळाल्याची भावना शेतकरी बांधवांनी व्यक्त केली.

श्रद्धास्थानाची परंपरा

कुद्रेमानीच्या ‘भूवाची पाऊले’ या ठिकाणाला ग्रामस्थांच्या श्रद्धेत विशेष स्थान आहे. पावसाने दीर्घकाळ दडी मारल्यास ग्रामस्थ एकत्र येऊन या पावलांची पूजा करतात. अभिषेक करून वरुणराजाकडे पावसासाठी प्रार्थना केली जाते. पिढ्यान्‌पिढ्या चालत आलेल्या या लोकपरंपरेतून ग्रामस्थांचे निसर्गाशी असलेले अतूट नाते दिसून येते.

रविवारी झालेल्या पूजेनंतर अवघ्या दोन दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने ‘भूवाची पाऊले’ देवस्थानावर ग्रामस्थांची श्रद्धा अधिक दृढ झाली आहे. पावसाच्या आगमनाने कुद्रेमानीची भूमी चिंब झाली असून, बळीराजाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत.

‘भूवाची पाऊले प्रसन्न झाली, वरुणराजाने हजेरी लावली आणि बळीराजा सुखावला,’ अशी भावना ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *