


बेळगाव : चोर्ला घाटात डंपर आणि कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात वडगाव येथील ४२ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी रात्री डेल्टा रिसॉर्टजवळ घडली. शाम उर्फ रवळनाथ तुळजाई (रा. आनंदनगर, वडगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाम तुळजाई हे गोव्याहून कारने बेळगावच्या दिशेने येत होते. यावेळी चोर्ला घाट रस्त्यावर डेल्टा रिसॉर्टजवळ जांबोटीच्या दिशेने गोव्याकडे जाणाऱ्या डंपरची त्यांच्या डॅटसन कारला जोरदार धडक बसली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चुराडा झाला.
अपघातानंतर शाम तुळजाई कारमध्ये अडकून पडले होते. त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने प्रयत्न सुरू केले. मात्र, कारची अवस्था अत्यंत खराब झाल्याने मृतदेह बाहेर काढण्यात अडथळे निर्माण झाले. अखेर खानापूर येथून वाहन कापण्याचे कटर मागवून कारचा काही भाग कापण्यात आला. त्यानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रात्री उशिरा मृतदेह खानापूर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला.
या अपघातप्रकरणी खानापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, अपघाताची नेमकी कारणे आणि परिस्थितीचा पोलीस तपास करीत आहेत.

Belgaum Varta Belgaum Varta