


खानापूर : खानापूर तालुक्यातील चोर्ला घाट रस्त्यावर डेल्टा रिसॉर्टजवळ मंगळवारी सायंकाळी डंपर आणि डॅटसन कार यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात डॅटसन कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, प्राथमिक माहितीनुसार एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जांबोटीच्या दिशेने गोव्याकडे जाणाऱ्या डंपरची आणि गोव्याहून बेळगावच्या दिशेने येणाऱ्या डॅटसन कारची डेल्टा रिसॉर्टजवळ जोरदार धडक झाली. धडकेनंतर डंपरने कारला काही अंतर फरफटत नेल्याचे सांगण्यात येत आहे.
या भीषण अपघातात कार पूर्णपणे चेपली गेल्याने आतील प्रवाशांना बाहेर काढणे कठीण झाले आहे. कारमध्ये दोन ते तीन जण प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती असून, त्यापैकी एकाचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. मात्र, प्रवाशांची नेमकी संख्या, मृतांची ओळख आणि जखमींची स्थिती याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळालेली नाही.
कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी खानापूरहून वाहन कापण्यासाठी आवश्यक कटर व इतर बचाव साहित्य मागविण्यात येत असल्याची माहिती आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत.
दरम्यान, अपघातग्रस्त कार वडगाव येथील व्यक्तींची असल्याचे प्राथमिकरीत्या समजते. अपघाताची माहिती मिळताच संबंधितांचे नातेवाईक घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातामुळे चोर्ला घाट परिसरात मोठी खळबळ उडाली असून, घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली आहे. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच मृतांची नेमकी संख्या, जखमींची स्थिती आणि अपघाताचे कारण स्पष्ट होणार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta