


बेळगाव : मारुती गल्ली, येळ्ळूर येथील प्रशांत अशोक पाटील यांनी आपल्या घरगुती गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी यंदा आकर्षक हालता देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे अनंत चतुर्दशीनंतरही हा देखावा गणेशभक्तांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. २१ दिवसांच्या गणेशोत्सवाची परंपरा जपत हा देखावा साकारण्यात आल्याने तो पाहण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होत आहे.
यंदाच्या देखाव्यात ‘मार्कंडेयांची शिवभक्ती’ हा धार्मिक प्रसंग साकारण्यात आला आहे. विविध कलाकृती आणि हालचालींच्या माध्यमातून हा प्रसंग जिवंत करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, भाविकांकडून त्याचे कौतुक होत आहे.
प्रशांत पाटील गेल्या दहा वर्षांपासून गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध विषयांवर कलात्मक हालते देखावे साकारत आहेत. त्यांच्या कलाकृतींनी जिल्हास्तरीय उत्कृष्ट गणपती डेकोरेशन स्पर्धेतही पारितोषिक पटकावले आहे.
यापूर्वी त्यांनी गड-किल्ल्यांची झालेली दुरावस्था, वृक्षसंवर्धनाची गरज, संभाजी महाराजांचे बलिदान, गड-किल्ल्यांचे संवर्धन, महाशिवरात्रीचा महिमा, ज्योतिबा मंदिर व दवणा, आंब्याच्या झाडाखाली नाचणारा मोर तसेच वटसावित्री व्रत अशा विविध विषयांवर हालते देखावे साकारून सामाजिक, ऐतिहासिक व धार्मिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
आपल्या कलाकृतीतून सातत्याने नवनवीन विषय मांडणाऱ्या प्रशांत पाटील यांच्या या उपक्रमाचे गणेशभक्तांकडून कौतुक होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta