


बेळगावची गणेशोत्सवाची परंपरा भव्य, उत्साही आणि अभिमानास्पद आहे. गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या हजारो नागरिकांचा उत्साह, भक्ती आणि जल्लोष हा या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. मात्र यंदाची विसर्जन मिरवणूक तब्बल ४२ तास चालली, ही बाब केवळ अभिमानाने सांगण्यापुरती न राहता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आणणारी आहे.
मिरवणूक भव्य असणे, लाखो नागरिकांचा सहभाग असणे आणि पारंपरिक उत्साह कायम राहणे यात निश्चितच बेळगावच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडते. मात्र एखादी मिरवणूक सलग ४२ तास चालत असेल, तर हा उत्सवाच्या भव्यतेचा भाग आहे की नियोजनातील त्रुटींचे लक्षण? हा प्रश्न आता नागरिकांसह प्रशासन आणि गणेशोत्सव मंडळांनीही गांभीर्याने विचारण्याची गरज आहे.
इतक्या प्रदीर्घ काळ चालणाऱ्या मिरवणुकीमुळे पोलीस दल, महानगरपालिका कर्मचारी, आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवक आणि अन्य संबंधित यंत्रणांवर प्रचंड ताण येतो. वाहतूक व्यवस्था विस्कळीत होते. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि इतर आपत्कालीन सेवांनाही अडथळ्यांचा सामना करावा लागू शकतो. शहरातील दैनंदिन व्यवहार आणि नागरिकांचे जीवनही दीर्घकाळ प्रभावित होते.
यामागे केवळ मंडळांची संख्या किंवा नागरिकांचा उत्साह कारणीभूत आहे, असे म्हणून प्रश्न बाजूला सारता येणार नाही. मिरवणुकीचा क्रम, मंडळांना दिल्या जाणाऱ्या वेळेचे नियोजन, मोठ्या मूर्तींमुळे होणारा विलंब, रस्त्यात वाहन थांबविणे, पारंपरिक वाद्यांच्या कार्यक्रमांचा कालावधी आणि प्रशासनाच्या सूचनांची अंमलबजावणी या सर्व बाबींचा पुढील वर्षासाठी वस्तुनिष्ठ आढावा घेणे आवश्यक आहे.
परंपरा मोडायची नाही, श्रद्धेला धक्का द्यायचा नाही आणि गणेशोत्सवाचा उत्साहही कमी करायचा नाही. मात्र श्रद्धेला शिस्तीची आणि उत्साहाला नियोजनाची जोड देणे हीदेखील काळाची गरज आहे.
पुढील वर्षी विसर्जन मिरवणुकीपूर्वी प्रशासन, गणेशोत्सव महामंडळ आणि सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेऊन वेळापत्रक निश्चित करणे, मंडळांना ठरावीक वेळेत विसर्जनस्थळी पोहोचण्याची जबाबदारी देणे आणि नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.
बेळगावची गणेशोत्सवाची परंपरा मोठी आहे; ती केवळ लांब मिरवणुकीने नव्हे, तर शिस्तबद्ध आणि आदर्श आयोजनानेही जगासमोर यायला हवी.
बाप्पाच्या भक्तीत उत्साह असावा; पण त्या उत्साहाला वेळेचे भान, शिस्त आणि नागरिकांच्या सोयीची जाणीवही असावी. पुढील वर्षीची मिरवणूक अधिक भव्य असण्याबरोबरच वेळेत, शिस्तीत, सुरक्षित आणि सुरळीत पार पडावी, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना.
गणपती बाप्पा मोरया! 🙏
प्रविण बाळकृष्ण रेडेकर
कार्यकर्ता, महाराष्ट्र एकीकरण समिती, बेळगाव
Belgaum Varta Belgaum Varta