


निपाणी (वार्ता) : मित्राला भेटण्यासाठी जात असताना पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर यमगर्णी गावाजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात निखील नितीन बोंगाळे (वय ३४, रा. बिरोबा माळ, लेटेक्स कॉलनी, निपाणी) या तरुणाचा अपघात झाला होता. त्याला उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण त्याची मृत्यूची झुंज एकाकी ठरली. त्यामुळे अखेर त्याची प्राणज्योत मालवली.
मुलग्याच्या अपघाती निधनाने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. तरीही न डगमगता बोंगाळे कुटुंबीयांनी सामाजिक कार्य म्हणून निखीलचे अवयव दान करण्याचा धाडसी व हृदयस्पर्शी निर्णय घेतला. या निर्णयामुळे पाच गरजू रुग्णांना नवे जीवनदान मिळाले असून, बोंगाळे कुटुंबाने समाजासमोर माणुसकीच आदर्श निर्माण केला आहे.
निखील बोंगाळे यांचे मूळ गाव बेळगाव आहे. बऱ्याच वर्षांपासून हे कुटुंबीय निपाणी येथे वास्तव्यास आहेत. निखील एका खासगी कंपनीत मार्केटिंग क्षेत्रात कार्यरत होता. रविवारी (ता.२७) रात्री तो राष्ट्रीय महामार्गावरील यमगर्णी गावातील मित्राला भेटायला जातो असे सांगून दुचाकीवरून निघाला. मात्र, बराच वेळ झाला तरी तो परतला नाही. मध्यरात्रीच्या सुमारास यमगर्णीजवळ त्याची दुचाकी घसरून गंभीर अपघात झाल्याची माहिती नातेवाईकांना मिळाली. स्थानिक नागरिक, वाहनधारक आणि पोलिसांनी त्याला तातडीने निपाणीतील महात्मा गांधी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे अतिदक्षता विभागात सुरू होते. पण प्रकृतीने साथ न दिल्याने अखेर त्याची प्राणज्योत मालवली. त्यामुळे नातेवाईक आणि मित्र परिवारावर शोककळा पसरली आहे.
——————————————————————–
कुटुंबाचा आधार हरपला
निखिल हा अत्यंत हुशार आणि कुटुंबाशी प्रामाणिक होता. कुटुंबीय सर प्रत्येक नातेवाईक आणि मित्र परिवारांच्या सुखदुःखात तो नेहमी सहभागी होत होता. त्याच्या खाली मूर्तीने कुटुंब आणि मित्र परिवाराचा आधार हरपला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta