


कोर्टाच्या आदेशाचा दाखला; कागदपत्रे सादर करण्याची मागणी करताच ठेकेदाराने मशिनरी हटवली
बेळगाव : बायपास रस्त्याच्या कामावरून शेतकरी आणि ठेकेदार यांच्यात पुन्हा वाद निर्माण झाला. हणमंत बाळेकुंद्री यांच्या शेतात ठेकेदाराकडून काम सुरू असताना संबंधित शेतकऱ्यांनी घटनास्थळी जाऊन काम थांबवले.
शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, संबंधित जमिनीबाबत न्यायालयात दावा सुरू असून, झिरो पॉईंट निश्चित होईपर्यंत दावेदार शेतकऱ्यांच्या शेतात प्रवेश करून त्यांच्या पिकांची नासाडी करू नये, असा न्यायालयाचा आदेश आहे. तसेच माहितीच्या अधिकारांतर्गत बायपास कामाची वर्क ऑर्डर मागितली असता, वर्क ऑर्डर उपलब्ध नसल्याचे स्पष्ट उत्तर मिळाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर वर्क ऑर्डर नसताना काम कसे सुरू केले, असा सवाल करत शेतकऱ्यांनी ठेकेदाराला जाब विचारला. यावेळी ठेकेदाराने पोलिसांना घटनास्थळी बोलावले. मात्र शेतकऱ्यांनी न्यायालयीन आदेश आणि उपलब्ध कागदपत्रांची माहिती पोलिसांना दिल्यानंतर, पोलिसांनीही संबंधित कागदपत्रे तपासूनच दाव्यातील जमिनीवर काम करण्याची सूचना ठेकेदाराला केली.
यानंतर ठेकेदाराने काम बंद करून आपल्या मशिनरी घटनास्थळावरून हटवल्या. न्यायालयीन आदेश आणि जमिनीच्या मालकीसंबंधीचा वाद असताना काम सुरू करण्यात आल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Belgaum Varta Belgaum Varta