


शास्त्रज्ञ डॉ. अमोल पाटील; बेनाडीतील सतीश पाटील यांच्या पपई बागेला भेट
निपाणी (वार्ता) : शेतात अधिक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने शेतकरी रासायनिक खतांचा डोस आणि अतिरिक्त पाणी पिकांना देत आहेत. त्यामुळे जमीन नापीक बनत चालली असून उत्पादन निम्म्याहून अधिक प्रमाणात घटले आहे. खत आणि पाण्याचा अतिरक पिकांना धोकादाय ठरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य प्रमाणात खाते व पाणी पुरवठा करावा. शिवाय भाजीपाला पिकासह पपई आणि केळीची बाग केल्यास फायदेशीर ठरते, असे आवाहन सोलापूर (महाड) येथील कृषी शास्त्रज्ञ डॉ.अमोल पाटील यांनी केले.
बेनाडी येथील प्रगतशील शेतकरी सतीश उर्फ पिंटू पाटील यांच्या पपई बागेची पाहणी करून ते बोलत होते. राजस्थानी प्रगतशील शेतकरी सुरेश पाटील होते.
प्रारंभी डॉ.पाटील आणि शेतकऱ्यांनी सतीश पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात घेतलेल्या पपई, केळीची बाग आणि ऊस पिकाची पाहणी केली. सतीश पाटील यांनी स्वागत करून आपण घेतलेल्या पिकांची माहिती दिली. त्यानंतर डॉ. पाटील व मान्यवरांचा सत्कार झाला.

डॉ. पाटील म्हणाले, शेतीमध्ये दरवर्षी आलटून पलटून पिके घेतल्यास जमिनीचा पोत टिकून राहून उत्पादन वाढते. खते आणि टॉनिकचा डोस मिश्रण करून दिल्यास पिकांच्या मुळांना पोषक अन्नद्रव्ये मिळून खताच्या खर्चात बचत होऊ शकते. दरवर्षी माती परीक्षण करून त्यानुसार पिके घेऊन ठिबकद्वारे पिकांना पाणी दिल्यास उत्पादन वाढते. त्यासाठी शेतकऱ्यांनी पारंपारिक शेती बंद करून अत्याधुनिक पद्धतीची शेती करणे आवश्यक असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉ.पाटील यांनी उत्तरे दिली.
कार्यक्रमास अरुण सावंत, महांतेश अंकली, सत्यप्पा हजारे, सुधाकर वाघाई, स्वप्निल शहा, बसवंत सावंत्रे, शंकर व्हदडी, मधुकर जाधव, बाळासाहेब देसाई, कृषीपंडित रामचंद्र पाटील, पांडुरंग पाटील, रावसाहेब जनवाडे यांच्यासह बेनाडी, आडी, हंचिनाळ, कुन्नूर, कागल, कोगनोळी यांच्यासह परिसरातील शेतकरी उपस्थित होते. पांडुरंग मधाळे यांनी सूत्रसंचालन केले.

Belgaum Varta Belgaum Varta