


सामान्य सभेनंतर अधिकारी-सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक; पालिका कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण
बेळगाव : महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून झालेल्या चर्चेनंतर सभा संपल्यानंतर अधिकारी आणि पालिका सदस्य यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची घटना बुधवारी घडली. पालिकेच्या विकास शाखेच्या उपआयुक्त लक्ष्मी निप्पाणीकर आणि एमआयएमचे नगरसेवक शाहिद खान पठाण यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याने काही काळ पालिका कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले.
सामान्य सभेत शाहिद खान यांनी आपल्याला लक्ष्य करून टीका केल्याचा आरोप लक्ष्मी निप्पाणीकर यांनी केला. विकासकामांवर चर्चा सुरू असताना, ‘काम करण्यास तुम्ही योग्य नाही’ अशा स्वरूपाची टीका केल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.
सभा संपल्यानंतर दोघांमध्ये कार्यालयातच जोरदार वाद झाला. यावेळी निप्पाणीकर यांनी संताप व्यक्त करत, “मी काम सोडण्यास तयार आहे; मात्र त्याला सोडणार नाही. माझ्याविरोधात बोलणारा तो कोण?” अशा शब्दांत नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले.
महिला अधिकाऱ्याचा कौन्सिलमध्ये अपमान करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, वाद शांत करण्यासाठी काही भाजप नगरसेवकांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांच्यावरही निप्पाणीकर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे.
“पैसे दिले तर सगळे चालते; मात्र मी त्याला एक पैसाही देणार नाही,” असे वक्तव्य झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे पालिका कार्यालयात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

Belgaum Varta Belgaum Varta