


महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांचा विरोध, सभात्याग
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अखेर ‘कर्नाटक समर्थनार्थ’ ठराव बहुमताने मंजूर करण्यात आला. बेळगाव कर्नाटकाचा अविभाज्य भाग असल्याचे घोषित करण्यासह महाजन आयोगाचा अहवाल अंतिम असल्याचा उल्लेख असलेला हा ठराव सभेच्या अखेरच्या टप्प्यात घाईघाईने मांडण्यात आल्याने सभागृहात वाद निर्माण झाला.
सभेच्या सुरुवातीपासूनच या ठरावाची मागणी विविध नगरसेवकांकडून करण्यात येत होती. मात्र, दिवसभर हा विषय चर्चेला घेण्यात आला नाही. अखेर सभेच्या समारोपाच्या वेळी महापालिका आयुक्त कार्तिक एम. यांनी राज्य सरकारकडून प्राप्त झालेले पत्र सभागृहात वाचून दाखविले. १९८८ मधील कर्नाटक विधानसभेच्या ठरावाचा संदर्भ देत महाजन आयोगाचा अहवाल अंतिम असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले होते.
यानंतर महापौरांनी ठराव मतदानास ठेवला आणि तो बहुमताने मंजूर झाल्याचे जाहीर केले. ठराव मंजूर होताच काँग्रेस आणि भाजपच्या नगरसेवकांनी बाके वाजवून समर्थन दर्शविले.
दरम्यान, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी ठरावाला तीव्र विरोध केला. नगरसेवक रवी साळुंखे, शिवाजीराव मंडोळकर आणि वैशाली भातकांडे यांनी ठरावाच्या प्रक्रियेवर आक्षेप घेत सभात्याग केला. सीमाप्रश्न न्यायप्रविष्ट असताना महापालिकेत अशा प्रकारचा ठराव घाईघाईने मंजूर करण्याच्या प्रक्रियेवर मराठी भाषिकांकडूनही नाराजी व्यक्त होत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta