


बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी बुधवारी बेळगावात आंदोलन करत तीव्र संताप व्यक्त केला. चन्नम्मा चौकात मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडवले.
भाजपचे राज्य उपाध्यक्ष अनिल बेनके यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी रिकाम्या घागरी तसेच विविध फलक हातात घेऊन सरकारविरोधात घोषणाबाजी केली.
आंदोलनादरम्यान मुख्यमंत्र्यांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न होताच पोलिसांनी हस्तक्षेप केला. प्रतिकात्मक मृतदेह ताब्यात घेण्याचा पोलिसांनी प्रयत्न केल्याने भाजप नेते आणि पोलिसांमध्ये काही काळ वादावादी झाली. त्यानंतर चन्नम्मा चौकातच प्रतिकात्मक मृतदेहाचे दहन करण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र पोलिसांनी त्यालाही परवानगी दिली नाही.
राज्य सरकारची आर्थिक स्थिती बिकट असूनही विविध भागांत कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची घोषणा केली जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. मुख्यमंत्री ज्या भागांना भेट देतात, तेथे विविध आश्वासने दिली जात असली तरी ती पूर्ण करण्यासाठी सरकारकडे निधी उपलब्ध नसल्याचा दावाही त्यांनी केला.
तसेच कंत्राटदारांची थकीत बिले देण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप करत भाजप कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी माजी आमदार संजय पाटील, भाजप राज्य महिला मोर्चा सचिव डॉ. सोनाली सरनोबत, मुरगेंद्रगौडा पाटील यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Belgaum Varta Belgaum Varta