Sunday , October 4 2026
Breaking News

कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला अखेर मुहूर्त!

Spread the love

 

जिल्हा रुग्णालयातील जुन्या ब्रिटिशकालीन इमारती जमीनदोस्त; १.३ एकर जागेचे सपाटीकरण सुरू

५० कोटींचा निधी मंजूर; उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या संभाव्य दौऱ्यात भूमिपूजनाचे नियोजन

बेळगाव : उत्तर कर्नाटकातील कर्करोग रुग्णांसाठी दिलासादायक ठरणाऱ्या बहुप्रतीक्षित कर्करोग रुग्णालयाच्या उभारणीला अखेर प्रत्यक्ष सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारात प्रस्तावित असलेल्या रुग्णालयासाठी निश्चित केलेल्या जागेवरील जुन्या इमारती जमीनदोस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, बहुतांश पाडकाम पूर्ण झाले आहे. आता या जागेचे सपाटीकरण करून बांधकामासाठी ती सज्ज केली जात आहे.

उत्तर कर्नाटकातील कर्करोग रुग्णांना बेळगावमध्येच अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने राज्य सरकारने २०२२ मध्ये किडवाई कर्करोग रुग्णालय प्रकल्पाला मंजुरी दिली होती. मात्र, जागेचा प्रश्न निर्माण झाल्याने मंजुरीनंतरही गेल्या चार वर्षांपासून प्रकल्प प्रत्यक्षात कागदावरच राहिला होता.

अखेर जिल्हा रुग्णालयाच्या आवारात सुमारे १.३ एकर जागा कर्करोग रुग्णालयासाठी निश्चित करण्यात आली. उपलब्ध जागेवरील जुन्या इमारती हटविण्याचे काम सुरू करण्यात आले असून, ब्रिटिशकालीन जुन्या वास्तूंसह नर्सिंग महाविद्यालयाच्या जुन्या इमारतीचा काही भागही हटविण्यात आला आहे. इमारती जमीनदोस्त केल्यानंतर बांधकामाला अडथळा ठरणारे अवशेष हटवून जागेचे सपाटीकरण केले जात आहे.

प्रस्तावित रुग्णालयाच्या उभारणीसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे केवळ जागेचा प्रश्नच सुटला नसून, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक आर्थिक तरतूदही उपलब्ध झाली आहे. बांधकामासाठी अडथळा ठरणारी काही झाडेही हटविण्यात आली असून, जागा अंतिम बांधकामासाठी तयार करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

  • चार वर्षांचा विलंब संपणार

किडवाई कर्करोग रुग्णालयाचा प्रकल्प मंजूर होऊन चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी जागेअभावी त्याला सुरुवात झाली नव्हती. आता जिल्हा रुग्णालयाच्या आवारात जागा उपलब्ध करून देण्यात आल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे कर्करोग उपचारासाठी बेळगावसह उत्तर कर्नाटकातील रुग्णांना मोठा आधार मिळणार आहे.

शिवकुमार यांच्या दौऱ्याकडे लक्ष

दरम्यान, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार लवकरच बेळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. त्यांच्या दौऱ्यादरम्यान प्रस्तावित कर्करोग रुग्णालयाच्या कामाचा शुभारंभ अथवा भूमिपूजन करण्याचे नियोजन असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आता प्रत्यक्ष मुहूर्त मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कर्करोगासारख्या गंभीर आजारावरील उपचारासाठी रुग्णांना बेळगावबाहेरील मोठ्या शहरांमध्ये धाव घ्यावी लागू नये, तसेच उपचाराचा आर्थिक आणि मानसिक भार कमी व्हावा, या दृष्टीने हे रुग्णालय उत्तर कर्नाटकासाठी महत्त्वाचे ठरणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

प्रा. आर. एस. पाटील यांची ‘Achievers of Karnataka’ पुरस्कारासाठी निवड

Spread the love  खानापूर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्यरत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *