


निपाणी (वार्ता) : निपाणी तालुक्यातील शेतशिवारात कृषी पंपांच्या कॉपर केबल, मोटारी तसेच सौरपंपांच्या वायर चोरी करणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. ऐन पिकांना पाणी देण्याच्या हंगामात रात्री किंवा पहाटेच्या वेळी चोरटे शेतात शिरून कृषी पंपांच्या केबल कापून लंपास करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, वेळेवर पाणी न मिळाल्याने पिके वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे.
पावसाअभावी खरिप हंगाम हातून गेला आहे. मात्र, ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा आहे. त्यांनी सिंचनाव्दारे पिके जगविली आहे. त्यातच कृषी पंपाच्या केबल चोरीचे
प्रमाण वाढल्याने त्यांचेही पिके धोक्यात आली आहे. बेनाडी, गाडी, जैनवाडी, कुन्नूर, मांगुर, हुन्नरगी सह परिसरात चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
शेतसाहित्य चोरीच्या घटनेत प्रचंड वाढ झाली आहे. वणी तालुक्यातील सिदनाळ येथील शेतातील बोअरमधून कृषी पंपाला जोडलेली सुमारे दोनशे फूट केबल चोरट्यांनी कापून लंपास केली. याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दोन वर्षांपूर्वी शेतातून मोटारपंप चोरी करणारी टोळी पोलिसांनी पकडली होती. त्याच्याकडून अनेक मोटारपंप जप्त करण्यात आले. सध्या शेतांमध्ये पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असताना कृषी पंपांच्या केबल चोरीच्या घटना वाढल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. केबल चोरीमुळे पाणीपुरवठा खंडित होत असून, पुन्हा नवीन केबल खरेदी व दुरुस्तीचा अतिरिक्त आर्थिक भार शेतकऱ्यांवर पडत आहे.

Belgaum Varta Belgaum Varta