


वडगावातील धामणे रोडवर दुर्दैवी घटना
बेळगाव : पतंग पकडण्याच्या नादात दुसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने नऊ वर्षीय शाळकरी मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. वडगावातील धामणे रोडवरील निजामिया नगर परिसरात मंगळवारी (३० सप्टेंबर) सायंकाळी सहाच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
साद मंजूरअली टिनवाले (वय ९) असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. तो निजामिया नगर, धामणे रोड, वडगाव येथे कुटुंबासह राहत होता. साद हा इयत्ता तिसरीमध्ये शिकत होता.
मंगळवारी सायंकाळी साद आपल्या घराशेजारील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर खेळत होता. यावेळी उडत आलेला पतंग पकडण्यासाठी तो पुढे सरसावला. पतंगाच्या नादात त्याने फायबरच्या पत्र्यावर पाय ठेवला; मात्र पत्रा तुटल्याने तो थेट दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला.
उंचावरून पडल्याने सादच्या डोक्याला व शरीराला गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर कुटुंबीयांनी आणि नागरिकांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी उपचार सुरू केले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
अवघ्या नऊव्या वर्षी सादवर काळाने घाला घातल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चिमुकल्याच्या अपघाती मृत्यूची बातमी समजताच परिसरात शोककळा पसरली.
सादच्या पश्चात आई-वडील, भाऊ, आजी-आजोबा, काका-काकी असा परिवार आहे.

Belgaum Varta Belgaum Varta