


बेळगाव : बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनचे स्केटर्स देवेन बामणे आणि साईराज मेंडके यांची दक्षिण अमेरिकेतील पॅराग्वे सिटी येथे होणाऱ्या जागतिक स्केटिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. देवेन हा के.एल.एस. जी.आय.टी. इंजिनिअरिंग कॉलेजचा, तर साईराज हा आर.एल.एस. कॉलेजचा विद्यार्थी आहे.
भारतीय संघाच्या निवड चाचण्या भुवनेश्वर (ओडिशा) आणि मोहाली (चंदीगड) येथे घेण्यात आल्या. स्पीड स्लालोम आणि अल्पाइन या प्रकारांत झालेल्या या चाचण्यांमध्ये दोघांनी उल्लेखनीय कामगिरी करत भारतीय संघात स्थान मिळवले.
देवेन आणि साईराज गेल्या १२ वर्षांपासून स्केटिंगचे प्रशिक्षण घेत असून, भारतीय संघातील निवडीसाठी त्यांनी रात्रंदिवस कठोर परिश्रम घेतले. आगामी जागतिक स्पर्धा २ ते १८ ऑक्टोबर या कालावधीत पॅराग्वे येथे होणार असून, या स्पर्धेत दोघेही भारतीय स्केटिंग संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
दोघेही स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, मंजुनाथ मंडोळकर, योगेश कुलकर्णी, विठ्ठल गंगणे आणि सोहम हिंडलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहेत.
देवेन आणि साईराज यांच्या निवडीबद्दल कर्नाटक रोलर स्केटिंग असोसिएशनचे सचिव इंदूधर सीताराम, आर.एल.एस. कॉलेजचे प्राचार्य विश्वनाथ कामगोळ, के.एल.एस. कॉलेजचे डॉ. विजय आठवले, दिगंबर कुलकर्णी, डॉ. जॉर्ज रॉड्रिग्ज, बेळगाव जिल्हा स्केटिंग असोसिएशनचे अध्यक्ष उमेश कलघटगी, प्रसाद तेंडुलकर, विनोद बामणे, ज्योती बामणे, श्रीकांत मेंडके आणि अर्चना मेंडके यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Belgaum Varta Belgaum Varta