


डी.के. शिवकुमारांनी असंवेदनशील वक्तव्ये थांबवावीत; मठाधीशांवरील वक्तव्याबद्दल माफी मागण्याची मागणी
बेळगाव : राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर तसेच उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांच्या कार्यपद्धतीवर खासदार जगदीश शेट्टर यांनी बेळगावात जोरदार टीका केली. कंत्राटदारांच्या संघटनेने राज्यात सुमारे ₹३८ हजार कोटींची बिले थकीत असल्याचा दावा केला आहे. मात्र, या प्रश्नावर डी.के. शिवकुमार यांच्याकडून असंवेदनशील उत्तरे दिली जात असल्याचा आरोप शेट्टर यांनी केला.
मागील सरकारच्या काळात कर्ज घेतले गेले होते, असे सांगितले जात असेल तर सध्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी तुमच्याकडे का आहे, याचे स्पष्टीकरण द्यावे, असे शेट्टर म्हणाले. सरकारने असंवेदनशील आणि उपरोधिक वक्तव्ये थांबवावीत, अशी मागणीही त्यांनी केली.
मंत्री एच.के. पाटील यांनी राजीनाम्याबाबत केलेल्या वक्तव्यावरही शेट्टर यांनी भाष्य केले. हे वक्तव्य दुष्काळामुळे नसून मंत्रीपदासंदर्भातील असमाधानातून करण्यात आले असल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्व घडामोडींकडे शांतपणे पाहत असून योग्य वेळेची प्रतीक्षा करीत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दरम्यान, मठाधीशांच्या कार्यक्रमात डी.के. शिवकुमार यांनी केलेल्या वक्तव्यांवरही शेट्टर यांनी आक्षेप घेतला. वीरशैव मठाधीशांबाबत तसेच मठांविषयी अशा प्रकारची वक्तव्ये करणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. संबंधित वक्तव्यांबद्दल शिवकुमार यांनी आपल्या गुरु अज्जय्या यांच्याकडे जाऊन माफी मागावी, अशी मागणी शेट्टर यांनी केली.
उर्दू उत्सवाच्या मुद्द्यावरूनही सरकारवर निशाणा
विधानसौधाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या उर्दू उत्सवाच्या मुद्द्यावरूनही शेट्टर यांनी सरकारवर टीका केली. एका विशिष्ट धर्माशी संबंधित कार्यक्रम विधानसौधात आयोजित करण्याऐवजी अशा धार्मिक कार्यक्रमांसाठी अन्य ठिकाणांचा वापर करावा, असे ते म्हणाले. सरकार अल्पसंख्याकांचे लांगूलचालन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
दरम्यान, शेट्टर यांच्या या आरोपांवर सत्ताधारी पक्षाकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे लक्ष लागले आहे.

Belgaum Varta Belgaum Varta