Sunday , October 4 2026
Breaking News

वृंदावन कॉलनीतील मैदानावर शेडला नागरिकांचा विरोध : रमाकांत कोंडुस्कर यांची महापालिका आयुक्तांकडे तक्रार

Spread the love

 

दोन दिवसांत शेड हटविण्याची मागणी

बेळगाव : भाग्यनगर (५वा क्रॉस) येथील वृंदावन कॉलनीतील लहान मुलांसाठी राखीव असलेल्या खेळाच्या मैदानावर उभारण्यात येत असलेल्या शेडला स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नागरिकांनी महानगरपालिकेकडे या बांधकामाबाबत तक्रारी करून मैदानावर कोणतेही शेड अथवा धार्मिक स्वरूपाचे बांधकाम करू नये, अशी मागणी केली होती.

संबंधित लेआउट रहिवाशांनी नियमानुसार सरकारी शुल्क भरून विकसित केलेला खासगी लेआउट असल्याने मैदानाच्या जागेवर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये, अशी नागरिकांची भूमिका आहे. मात्र, स्थानिक भाजप नगरसेवकांचा दबाव आणि महापालिकेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त करत नागरिकांनी महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांतदादा कोंडुस्कर यांची भेट घेतली.

दरम्यान, बांधकाम सुरू असताना नागरिकांनी कंत्राटदाराकडे चौकशी केली असता, हे शेड नवरात्रोत्सवात देवीच्या स्थापनेसाठी महानगरपालिकेकडून अधिकृत मंजुरी मिळाल्यानंतर उभारण्यात येत असल्याचे कंत्राटदाराने सांगितल्याचा दावा नागरिकांनी केला.

यावर नागरिकांनी आक्षेप घेत, “एका गल्लीतील किंवा विशिष्ट मंडळासाठी महापालिकेने अशा प्रकारे शेड उभारणे योग्य आहे का? निधी उपलब्ध असेल तर शहरातील ज्या ठिकाणी सरकारी जागा उपलब्ध आहे, त्या सर्व ठिकाणी समान सुविधा द्याव्यात,” असा सवाल उपस्थित केला.

या तक्रारीची दखल घेत रमाकांतदादा कोंडुस्कर यांनी महानगरपालिका आयुक्त जी. कार्तिक यांच्याशी संपर्क साधून संबंधित शेड दोन दिवसांत हटविण्याची मागणी केली. तसेच, बेळगाव शहरात शंभरहून अधिक नवरात्रोत्सव मंडळे आहेत. एका मंडळासाठी अशा प्रकारची सुविधा दिली जात असेल, तर सर्व मंडळांना समान निकष लागू करावेत; एकाला एक आणि दुसऱ्याला वेगळा न्याय देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.

या प्रकरणी महापालिका प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नसून, शेडला देण्यात आलेली मंजुरी, जागेचा वापर आणि बांधकामाची वैधता याबाबत पुढील कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

About Belgaum Varta

Check Also

ई-केवायसीमध्ये बेळगाव जिल्हा राज्यात अव्वल

Spread the love  १७.७१ लाख लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण; १० ऑक्टोबरपर्यंत उर्वरित ४.७३ लाख जणांचे ई-केवायसी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *