


प्रा. डॉ. संजीवनी खंडागळे; रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सभा व गुणवंत पाल्यांचा गुणगौरव
निलजी : मुलांच्या नकारात्मक गोष्टींचा बाऊ न करता त्यांच्या बुद्धीला सकारात्मकतेची वाट दाखविली, तरच ते भविष्यात उत्तम नागरिक घडतील. पालकांनी मुलांशी अधिकाधिक संवाद साधून त्यांच्या आवडीनिवडी, अडचणी आणि भावना जाणून घ्याव्यात. संवादातून कुटुंबातील जिव्हाळा व प्रेम वाढून सकारात्मक वातावरण निर्माण होते, असे प्रतिपादन प्रा. डॉ. संजीवनी खंडागळे यांनी केले.
निलजी येथील रणझुंझार को-ऑप. क्रेडिट सोसायटीची वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा गुणगौरव सोहळा रणझुंझार हायस्कूलच्या कै. अशोकराव मोदगेकर सभागृहात उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख वक्त्या म्हणून डॉ. खंडागळे बोलत होत्या.
त्या म्हणाल्या, आजच्या काळात पालक आणि मुलांमधील संवाद कमी झाल्याने अनेक कौटुंबिक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे पालकांनी मुलांशी मोकळेपणाने संवाद साधावा. सध्याचे युग कृत्रिम बुद्धिमत्तेचे असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान हाताळण्याचे कौशल्य आत्मसात करणे आवश्यक आहे. स्पर्धेच्या युगात कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीबरोबरच विविध कलांचा विकास करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील होते. प्रमुख पाहुण्या म्हणून रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर उपस्थित होत्या.
प्रारंभी रणझुंझार हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ईशस्तवन सादर केले. स्वागतगीताने प्रमुख अतिथी, सभासद व उपस्थितांचे स्वागत करण्यात आले. डॉ. संजीवनी खंडागळे, रमेश मोदगेकर, प्रकाश धानगावडे, चंदा गाडेकर, निर्मला गोमाणाचे, अमर मोदगेकर, सिद्धराय वर्पे आदी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.
रणझुंझार सौहार्द सोसायटीच्या संचालिका उज्वला पाटील यांच्या हस्ते सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. संस्थेचे संस्थापक कै. अशोकराव मोदगेकर यांच्या प्रतिमेला सोसायटीचे उपाध्यक्ष सिद्धराय पाटील यांनी पुष्पहार अर्पण केला. प्रमुख अतिथी डॉ. संजीवनी खंडागळे यांचा रणझुंझार शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा विमलताई मोदगेकर यांच्या हस्ते शाल व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित संचालक, सल्लागार व मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील यांनी वार्षिक अहवालाचे वाचन करून संस्थेच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतला. संस्थेचे ३,१८७ सभासद असून वसूल भागभांडवल ८८ लाख ४२ हजार रुपये आहे. विविध ठेव योजनांमधून संस्थेकडे २४ कोटी ८४ लाख ४२ हजार ६६७ रुपयांच्या ठेवी जमा आहेत. अन्य संस्थांमध्ये ९ कोटी ८१ लाख १६ हजार ६२९ रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. सभासदांना विविध प्रकारच्या कर्जांतर्गत १९ कोटी १९ लाख ४६ हजार ४५९ रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे.
संस्थेकडे राखीव व इतर निधी म्हणून २ कोटी ९७ लाख १६ हजार २६४ रुपये असून वार्षिक उलाढाल ६४ कोटी ३२ लाख ७९ हजार रुपये झाली आहे. वर्षअखेरीस संस्थेला ३० लाख ६३ हजार ६०० रुपयांचा नफा झाला असून सभासदांना १२ टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले.
संस्थेचे उपाध्यक्ष निखिल मोदगेकर यांनी संस्थेच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याची माहिती देत सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आणि दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शक रामचंद्र मोदगेकर, महेश मोदगेकर, परशराम पाटील, पल्लवी पाटील, भाऊसाहेब मोदगेकर, नारायण अक्षीमनी, पुंडलिक चौगुले, दुधाप्पा बसरीकट्टी, भरमा मुकुंद, स्वाती पाटील यांच्यासह बहुसंख्य सभासद, हितचिंतक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रास्ताविक सिद्धाप्पा जत्राटी यांनी केले. सूत्रसंचालन किरण मोदगेकर यांनी केले, तर कपिल पाटील यांनी आभार मानले.

Belgaum Varta Belgaum Varta