


१९८ मतदारांची नावे हटविण्यासाठी बनावट अर्ज केल्याचा आरोप; बेळगावच्या मार्केट पोलिसांत एफआयआर
बेळगाव : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अल्पसंख्याक समाजातील १९८ मतदारांची नावे यादीतून वगळण्यासाठी बनावट कागदपत्रे व खोटी माहितीच्या आधारे फॉर्म क्रमांक ७ सादर करण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून भाजप नेते डॉ. रवी पाटील यांच्यासह २० ते २५ जणांविरुद्ध बेळगावच्या मार्केट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वार्ड क्रमांक १२ मधील बूथ लेव्हल ऑफिसरने (BLO) ३० सप्टेंबर रोजी याबाबत पोलिसांत तक्रार दिली. डॉ. रवी पाटील, विजय हॉस्पिटलचे कर्मचारी प्रशांत मुंदिनमन तसेच शंकर नाईक यांच्यासह अन्य व्यक्तींवर आरोप करण्यात आला आहे.
२२ सप्टेंबर रोजी वीरभद्रनगर येथील मतदान केंद्र क्रमांक १९५ व १९६ परिसरात हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. जिवंत असलेल्या आणि कायदेशीररीत्या मतदार यादीत नोंद असलेल्या मुस्लिम मतदारांची नावे लक्ष्य करून ती वगळण्यासाठी प्रयत्न झाल्याचा आरोप आहे.
फॉर्म क्रमांक ७च्या माध्यमातून संशयास्पद अर्ज सादर करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता. त्यावेळी डॉ. रवी पाटील यांच्यासह तिघांना स्थानिकांनी रोखून विचारणा केल्याचे सांगण्यात आले.
घटनेनंतर आठ दिवसांनी दाखल झालेल्या तक्रारीवरून मार्केट पोलिसांनी गुन्हा क्रमांक २१८/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, गुन्हा दाखल होणे म्हणजे आरोप सिद्ध होणे नव्हे. प्रकरणाचा तपास आणि न्यायालयीन प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

Belgaum Varta Belgaum Varta