


आळंदीतील खासगी क्लासेसच्या सहलीवर काळाचा घाला; समुद्राच्या खोलीचा अंदाज चुकला
रायगड (नरेश पाटील) : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी गुरुवारी (१ ऑक्टोबर) घडलेल्या भीषण दुर्घटनेत पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. पर्यटनासाठी दिवेआगर येथे आलेल्या विद्यार्थ्यांनी समुद्रात प्रवेश केला असता पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तसेच समुद्राच्या प्रवाहामुळे काही विद्यार्थी वाहून गेल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ, वॉटर स्पोर्ट्सचे कर्मचारी तसेच दिघी कोस्टल-बोर्ली पंचतन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष आहाते यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अथक प्रयत्नांनंतर समुद्रातून आठही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले.
मृतांमध्ये यश किरण वानखेडे (१६), सोहम तुकाराम भांडवळकर (१६), तन्मय दत्तात्रय विहिले (१६), कौस्तुभ संदीप डोंड, कैवल्य सतीश वस्कर, राजवीर युवराज विहिले, प्रणव रामदास बन्सोडे आणि सुमित भरत आहिरे यांचा समावेश आहे.
सर्व मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील वैद्यकीय व कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या हृदयद्रावक घटनेमुळे दिवेआगर परिसरासह आळंदीमध्ये शोककळा पसरली असून, मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Belgaum Varta Belgaum Varta