


बेळगाव : SIR अर्थात मतदार यादीच्या विशेष पुनरिक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेते व कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा भाजपच्या राज्य महिला मोर्चाच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांनी तीव्र निषेध केला आहे.
यासंदर्भात जारी केलेल्या निवेदनात त्यांनी आरोप केला की, राज्यातील काँग्रेस सरकारकडून भाजप कार्यकर्त्यांवर सातत्याने अन्याय व दडपशाही केली जात आहे.
अपात्र मतदारांची नावे तपासून ती मतदार यादीतून वगळावीत, अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून तपासणी करून नियमानुसार कारवाई केली जाईल. मात्र, या प्रक्रियेत काँग्रेसकडून अनावश्यक हस्तक्षेप केला जात असल्याचा आरोप डॉ. सोनाली सरनोबत यांनी केला.
राज्यात सुशासन आणि विकासासाठी जनतेने काँग्रेसला सत्तेची संधी दिली आहे. मात्र, जनतेच्या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी काँग्रेसचे नेते अनावश्यक मुद्द्यांमध्ये वेळ वाया घालवत आहेत, अशी टीका त्यांनी केली.
सरकारच्या कथित प्रशासकीय अपयशावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी अशा मुद्द्यांना हवा दिली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजप नेते आणि कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून राजकीय दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न थांबवावा, अशी मागणी त्यांनी केली.
“किरकोळ राजकारण सोडून काँग्रेस सरकारने राज्याच्या प्रशासनाकडे आणि जनतेच्या समस्यांकडे लक्ष द्यावे,” असे आवाहन डॉ. सोनाली सरनोबत यांनी केले.

Belgaum Varta Belgaum Varta